Rajkot Fort Closed : राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद; मोठं कारण आलं समोर
Rajkot Fort Closed For Tourists : राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंतआजपासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे.
मालवणमधील किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर राज्यभरातून शिवप्रेमींना संताप व्यक्त केला होता. शिवप्रेमींच्या संतापानंतर राज्य सरकारने पुन्हा नव्याने तितकाच रुबाबदार आणि मोठा पुतळा बसविण्याचा शब्दही दिला होता, त्यानुसार आता मालवण किल्ल्यावर शिवरायांचा नवा पुतळा दिमाखात उभारला आहे. शिवरायांचा नवा पुतळा बसवल्यानंतर देखील येथील चबुतऱ्याजवळ काही काम बाकी असल्याचं किंवा काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर, आता येथील प्रशासनाने दखल घेतली आहे.