Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा

Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा

| Updated on: Aug 30, 2026 | 5:23 PM

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नावाचा गैरवापर करून एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीके शॉर्ट्स व्हिडिओज या युट्यूब चॅनेलवर प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षकाला महापौरांचे पती म्हणून चुकीच्या पद्धतीने दर्शवण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नावाचा गैरवापर करत एका फोटोग्राफी शिक्षकाची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युट्यूबवर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये संबंधित शिक्षकाला महापौर रितू तावडे यांचे पती म्हणून खोटा दावा करण्यात आला होता. या प्रकरणी राजेश तावडे नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरून मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात बदनामीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीके शॉर्ट्स व्हिडिओज या युट्यूब चॅनेलवरून हा व्हिडिओ राजनेता रितू तावडे के पती का जीवन परिचय या शीर्षकासह प्रसारित करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये तक्रारदाराचा फोटो वापरून त्यांची ओळख बिल्डर आणि बी.कॉम पदवीधर अशी करून देण्यात आली होती, तसेच महापौर रितू तावडे त्यांच्या पत्नी असल्याचा खोटा दावा करण्यात आला. तक्रारदाराचा फोटो त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून, तर महापौरांचा फोटो सोशल मीडियावरून घेऊन एकत्र करण्यात आला होता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तेच महापौरांचे पती असल्याचा आभास निर्माण केला जात होता. २३ ऑगस्ट रोजी अपलोड झालेल्या या व्हिडिओबाबत पोलिसांनी आता युट्यूब चॅनेलची आणि व्हिडिओची सखोल चौकशी सुरू केली आहे.

Published on: Aug 30, 2026 5:23 PM
Follow Us