महाविकास आघाडीत पराभवाचे खापरफोडणे सरु, अबू आझमी यांचा अखेर आखरी सलाम
आपण महाविकास आघाडीकडे १२ जागा मागितल्या होत्या आठ ठिकाणी अर्ज भरले होते. आणि आमच्या दोन जागा निवडून आल्याचे समाजवादी पार्टीचे नेते अबू आसीम आझमी यांनी म्हटले आहे. विधीमंडळ अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर अबू आझमी यांनी महाविकास आघाडीवर बॉम्बगोळा टाकला आहे.
महायुतीचा महाविजय झाल्यानंतर सरकार स्थापन झाले आहे. दुसरीकडे आता महाविकास आघाडीत पराभवाचे खापर एकमेकांवर फोडण्याचे काम सुरु झालेले आहे. शिवाजीनगर – मानखुर्द येथून विजय झालेल्या महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे अबू असीम आझमी यांनी आता महाविकास आघाडीचा पराभव परस्परांत समन्वय नसल्याने झाल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही कॉर्डीनेशन किंवा समन्वय नव्हता. जेव्हा आघाडी असते तेव्हा एकमेकांच्या प्रचारासाठी एकमेकांच्या मंचावर जावे लागते. परंतू महाविकास आघाडीत हे अभावानेच पहायला मिळालेले आहे. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकमेकांच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचे सोडून तिकीटासाठी एवढी खिचाताणी झाली की यामुळे मतदारांचा विश्वास उरला नाही. त्यामुळे पराभव झाल्याचे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी म्हटले आहे. त्यामुळे अबू असीम आझमी यांनी महाविकास आघाडीला सोडचिट्टी दिल्याचे म्हटले जात आहे.