Sandeep Deshpande : ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा… संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा
'आम्ही शांतता आणि लोकशाही पद्धतीने मोर्चा करतोय. यासंदर्भात अनेकांचे मराठी माणसांसह फोन आले की, सरकारची दडपशाही सहन करणार नाही. आता पोलिसांनी ठरवायचं की, त्यांच्या जेलमध्ये जागा किती अन् मराठी माणसं किती?' संदीप देशपांडेंनी असा सवाल केलाय.
मीरा-भाईंदरमधील मनसेच्या मराठी मोर्चाची परवानगी स्थानिक पोलिसांनी नाकरल्यानंतर वातावरण चांगलंच चिघळलं आहे. यासंदर्भात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्र सरकार खोटं बोलतंय. आमचं म्हणणं एकच आहे की, आम्हाला थांबवायचंय तर मोर्चाला परवानगी द्या. पोलीस आम्हाला सांगतात घोडबंदरला मोर्चा काढा. जी घटना मीरा भाईंदर येथे घडली त्याचा ठाणे घोडबंदरला मोर्चा कसा काढणार?’, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला. पुढे संदीप देशपांडे असेही म्हणाले की, आता जशी आमच्यावर कारवाई करताय तशी व्यापाऱ्यांवर केली का? आम्हाला नोटीस पाठवताय, मध्यरात्री आरोपी असल्यासारखे ताब्यात घेताय, ही सरकारची आणबीणी आहे. आम्ही मोर्चाचा मार्ग बदलायला तयार होतो. तरीही परवानगी नाकारली, याचा अर्थ तुम्हाला परवानगी द्यायची नाही. पोलिसांना हे प्रकरण चिघळवायचं होतं हा आमच्या मनातीला संशय आहे. भाजपला राज्यात अशांतता निर्माण करायची आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारलाय.

