थार, फॉर्च्युनर गाड्या अन् बरंच काही! सांगलीमध्ये उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील योगीवाडी येथे चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ५ लाख शेतकऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या शर्यतीत महिला गटांचाही सहभाग असेल.
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील योगीवाडी येथील खोड्याच्या माळावर ४००-५०० एकरांमध्ये भव्य श्रीनाथ बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी राज्यातले आणि देशातले पहिले शिवसेना बैलगाडा शर्यतीचे अधिवेशन याच ठिकाणी भरवले आहे. या शर्यतीसाठी आणि अधिवेशनासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी बांधव सहभागी होणार आहेत. ९ तारखेला सकाळी ७ वाजल्यापासून या शर्यतींना सुरुवात होईल. दुपारी २ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. महिला बैलगाडा शर्यती हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असून, १०० महिलांना गोवंश संवर्धनासाठी गायी दिल्या जाणार आहेत. विजेत्यांसाठी थार, फॉर्च्युनर गाड्या, १५० टू-व्हीलर आणि ट्रॅक्टर अशा कोट्यवधी रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

