Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा…
कर्नाटकातील वादावरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच सुनावले आहे. मतमोजणीच्या फेरतपासणीचे मूळ रेकॉर्डिंग गहाळ झाल्याने कोर्टाने आयोगाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुढील सुनावणीत सर्व रेकॉर्ड सादर न केल्यास कठोर निष्कर्ष काढण्याचा इशाराही कोर्टाने दिला आहे.
कर्नाटकातल्या एका वादावरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच फैलावर घेतले आहे. निवडणूक आयोगातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ कशी होऊ शकतात, असा थेट सवाल कोर्टाने विचारला आहे. निवडणूक प्रक्रिया आणि तिची अखंडता राखणे ही आयोगाची मुख्य जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित कागदपत्रे सुरक्षित असायलाच हवीत, अशा शब्दांत कोर्टाने आयोगाला सुनावले.
मतमोजणीच्या फेरतपासणीचे मूळ व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध नसल्याचे निवडणूक आयोगाकडून कोर्टामध्ये सांगण्यात आले. यावर, “रेकॉर्ड शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे,” हा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केला. आयोगाची कार्यपद्धती आणि जबाबदारी यावर कोर्टाने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
पुढील सुनावणीला सर्व उपलब्ध रेकॉर्ड सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिले आहेत. जर आयोगाने हे रेकॉर्ड सादर केले नाहीत, तर आयोगाविरोधात कठोर निष्कर्ष काढू असा स्पष्ट इशाराही कोर्टाने दिला आहे. या प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर आणि पारदर्शकतेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
