Satish Bhosale Case : रील्स टाकण्यासाठी मुकादमाकडून पैसे आणले होते; खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा
Shirur Crime Accuse Satish Bhosale : सतीश उर्फ खोक्या भोसले याला न्याय मिळावा, त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी प्रतिक्रिया खोक्याची पत्नी तेजू सतीश भोसले हिने माध्यमांना दिली आहे.
शिरूर कासार मारहाण प्रकरणातील आरोपी आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची प्रतिक्रिया खोक्याची पत्नी तेजू सतीश भोसले हिने दिली आहे. खोक्याला रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे घेऊन गेले होते. रील्स टाकण्यासाठी त्यांनी मुकदमाकडून उसने पैसे आणले होते. आम्हाला कोणतीही नोटिस न देता आमचं घर पाडण्यात आलं, असंही तेजू भोसले हिने म्हंटलं आहे.
शिरूर कासारच्या मारहाण प्रकरणात सतीश उर्फ खोक्या हा आरोपी आहे. त्याने हरणांची देखील शिकार केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या खोक्या पोलीस कोठडीत आहे. वन विभागाकडून याच घटनास्थळी असलेल्या सतीश भोसले याच्या घरावर तोडक कारवाई केली आहे. हे घर वन विभागाच्या जागेत असून अतिक्रमण असल्याने सतीश भोसलेच्या घरावर बुलडोजर चालवण्यात आलेलं आहे. त्यानंतर एवढी घाई का? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. त्यातच सतीश भोसले याच्या पत्नीने या संपूर्ण घटनेवर आपली प्रतिक्रिया देत या भागातील सर्व अतिक्रमण काढण्याची मागणी केली आहे.