Eknath Shinde Video : ‘टूरिस्ट म्हणून येतात अन् पायऱ्यांवरून…’, विधानपरिषदेत एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेश सुरू आहे. अशातच विधानभवनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी बघायला मिळत आहे. अशातच विधानपरिषदेत बोलत असताना शिंदेंनी ठाकरेंवर चांगलाच घणाघात केलाय.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवेसनेचे नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात नेहमीच आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात. अशातच विधानपरिषदेत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे हे टूरिस्ट म्हणून येतात आणि सभागृहाबाहेर आरोप करून बाहेरूनच निघून जातात, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. इतकंच नाहीतर विधानभवनाच्या पायऱ्यांवरून बघायचा चॅनलचा बूम अन् ठोकायची धूम, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जिव्हारी लागणारी टीका केली आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून पलटवार करण्यात आला आहे. ‘एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याला आता महाराष्ट्रात फारसं महत्त्व राहिलं नाही’, असं संजय राऊत म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या बोलण्याला आता महत्व नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला महाराष्ट्रात महत्त्व आहे. एकनाथ शिंदेंच आता कोण ऐकणार? लिहून दिलेली भाषणं वाचायची, टिवल्या बावल्या करायच्या.. असं म्हणत राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे,