जीभ छाटण्यापासून ते विष्ठेपर्यंत… टीका करताना नेत्यांचा तोल सुटला, कोणाकडून 11 लाखांचं बक्षीस जाहीर
पक्षपातीपणा थांबेल तेव्हा काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेल, असं राहुल गांधी म्हणाले होते. अमेरिकेतल्या राहुल गांधींच्या या वक्तव्याला एक आठवडा होतोय. त्यावरुन महाराष्ट्रात भाजपची आंदोलनंही झाली. पण, आता राहुल गांधींची, जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं इनाम देण्याची घोषणाचा संजय गायकवाडांनी केली.
विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र टीका करताना नेत्यांचा तोल गेलाय. संजय गायकवाडांनी राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा केली. तर सदाभाऊ खोतांनी महाविकास आघाडीला रेडा म्हणत चाबकानं मारण्याची भाषा केली. शिंदेंचे आमदार संजय गायकवाड, राहुल गांधींची जीभ छाटण्याच्या मागे लागलेत. तर, भाजप समर्थित आमदार सदाभाऊ खोत, महाविकास आघाडीला रेडा समजून चाबकानं फोडण्याची भाषा करतायत. संजय गाकवाडांआधी, दिल्ली भाजपचे नेते तरविंदर सिंह मारवा यांनी तर दादी जैसा हाल करेंगे म्हणत जीवे मारण्याचीच धमकी दिली. काँग्रेसचे हायकमांड आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींची जीभ उडवण्याची भाषा केल्यानं, काँग्रेसचे नेते गायकवाडांवर तुटून पडले. तर शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी, गायकवाडांचं वक्तव्य चूक असल्याचं म्हटलंय. संजय गायकवाडां पाठोपाठ आपल्या वक्तव्यानं चर्चेत राहणाऱ्या सदाभाऊ खोतांनीही, महाविकास आघाडीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रेड्यांना चाबकानं फोडून काढणार, असं सदाभाऊ म्हणालेत.