संजय गायकवाड यांची ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर ठेवली नवी अट
संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालं आहे. काँग्रेसकडून राज्यभरात संजय गायकवाडांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जातोय. अशातच त्यांनी त्यांचं वक्तव्य मागे घेण्याची तयारी दर्शवली आहे. पण त्याबरोबर एक अटही ठेवली आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार अन् प्रवक्ते संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठं वादंग सुरू झाल्यानंतर आता संजय गायकवाड हे आपण आपले शब्द मागे घेण्यास तयार असल्याचे दिसतेय. मात्र आपले शब्द मागे घेण्यापूर्वी त्यांनी एक समोर ठेवली आहे. “जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार”, असं संजय गायकवाड यांनी म्हटले होते. “राहुल गांधी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे, संविधानाचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत जे वक्तव्य केलं त्यावरुन त्यांनी चैत्यभूमीवर जावून माथा टेकून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी”, अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली आहे. पुढे ते असेही म्हणाले की, “राहुल गांधी यांनी चैत्यभूमीवर जावून माफी मागावी. जर राहुल गांधी यांनी माफी मागितली तर मी माझे शब्द मागे घेणार”, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत. बघा नेमकं काय म्हणाले संजय गायकवाड?