AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास..., खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण

Sanjay Raut | देशाच्या संविधानावर विश्वास…, खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय… संजय राऊतांच्या एका पोस्टने रंगवलं राजकारण

| Updated on: Aug 06, 2026 | 10:30 AM
Share

शिवसेना पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्हाच्या मालकी हक्कासंदर्भातील सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत एक सूचक पोस्ट केली.

शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या मालकी हक्कासंदर्भातील वादावर सर्वोच्च न्यायालयात काल महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी न्यायालयात सांगितले की, प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर निकाल केवळ विधिमंडळ पक्षाच्या संख्येच्या आधारे देण्यात आला. मात्र, विधिमंडळ पक्ष हा मूळ राजकीय पक्ष नसून त्याचा केवळ एक भाग आहे. त्यामुळे केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारावर पक्ष आणि चिन्हाचा निर्णय घेणे कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरू शकत नाही. तसेच पक्षाची घटना योग्य आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसल्याचाही दावा त्यांनी न्यायालयात केला.

सुनावणीदरम्यान ठाकरे गटाने शिंदे गटाला पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेत सविस्तर बाजू मांडली. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये जोरदार युक्तिवाद झाला असून, प्रकरणाची पुढील सुनावणी आज दुपारी दोननंतर होणार आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सुनावणीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत एक सूचक पोस्ट केली. “आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे… यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय… याबाबत आमच्या मनात शंका नाही. जय महाराष्ट्र!” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

यासोबतच संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष फुटलाच नसल्याचा दावा पुन्हा एकदा केला. ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि मूळ शिवसेना ठाकरे गटाकडेच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेत योग्य घटनात्मक मर्यादा निश्चित कराव्यात, असेही त्यांनी म्हटले. आज होणाऱ्या पुढील सुनावणीत शिंदे गटाची बाजू मांडली जाणार असून, या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 06, 2026 10:30 AM

Follow Us