Supriya Sule | ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है! पेट्रोल-डिझेल संकटावर सुप्रिया सुळेंचा मोठा इशारा, म्हणाल्या….

| Updated on: May 25, 2026 | 3:36 PM

देशात वाढत्या इंधन तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाला असून काही पेट्रोल पंपांवर ‘इंधन उपलब्ध नाही’ असे फलक लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

देशात वाढत्या इंधन तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा विस्कळीत झाला असून काही पेट्रोल पंपांवर ‘इंधन उपलब्ध नाही’ असे फलक लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “इंधन दरवाढ आणि तुटवड्याबाबत आम्ही सहा महिन्यांपूर्वीच सरकारला इशारा दिला होता, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं,” असा आरोप त्यांनी केला.

माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी, राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेते संसदेपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबाबत आणि संभाव्य संकटाबाबत बोलत होतो. सरकारकडे योग्य नियोजन नसल्याचं आम्ही वारंवार सांगितलं होतं आणि आता त्याचे परिणाम देशभर दिसत आहेत.” त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही केली.

“जगभरात आर्थिक संकटाचं वातावरण आहे. भारतातही आर्थिक परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. अशा वेळी सरकारने जबाबदारीने वागून सर्व पक्षांना विश्वासात घ्यायला हवं,” असं त्या म्हणाल्या. “आता फक्त दरवाढीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, पुढे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरूनही सुप्रिया सुळे यांनी सरकारवर निशाणा साधला. “शेतकरी, सामान्य नागरिक आणि मध्यमवर्गीय प्रचंड अडचणीत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही योग्य दर मिळत नाहीत. सरकारकडे यावर ठोस उपाययोजना दिसत नाहीत,” अशी टीकाही त्यांनी केली. तसेच, “अन्नधान्य आणि पैशाचं सोंग घेता येत नाही,” असं म्हणत त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

 

Published on: May 25, 2026 3:36 PM
Follow Us