एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं!; सुरतमध्ये एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला

एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं!; सुरतमध्ये एसटीच्या भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला

| Updated on: Jun 03, 2026 | 10:22 AM

गुजरातमधील सुरत जिल्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात झाला. सुरत-धुळे महामार्गावरील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत किमान सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून 41 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गुजरातमधील सुरत जिल्ह्यात मंगळवारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात झाला. सुरत-धुळे महामार्गावरील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत किमान सात प्रवाशांचा मृत्यू झाला असून 41 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत ते धुळे मार्गावर धावणाऱ्या एसटी बसला मागून भरधाव ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे बसचा ताबा सुटून ती रस्त्यावरील दुभाजक ओलांडत समोरील लेनमध्ये घुसली. त्याचवेळी जामनेर ते सुरत मार्गावर धावणारी दुसरी एसटी बस समोरून येत होती. दोन्ही बसांची जोरदार धडक झाल्यानंतर एक बस रस्त्याच्या खाली घसरली आणि तिला आग लागली.

अपघातानंतर बसमध्ये आग लागल्याने मोठा स्फोट झाला आणि घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की दोन्ही बसांचा मोठ्या प्रमाणात चक्काचूर झाला. प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही बसचे चालक जागीच ठार झाले असून अन्य काही प्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी प्रवाशांना सुरत आणि परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातामुळे सुरत-धुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण आणि संपूर्ण परिस्थितीचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.

Published on: Jun 03, 2026 10:20 AM
Follow Us