उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरचे बृजेश शिवानंद कुडले हे आपला मुलगा घेऊन शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले आहेत. मेळाव्यासाठी ते सर्वात आधी पोहोचले असून, व्यासपीठासमोरील पहिली सीट त्यांनी मिळवली आहे. संविधान आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे काय बोलतात, हे ऐकण्यासाठी ते उत्सुक आहेत.
दसरा मेळाव्याची बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली परंपरा आजही कायम आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक दरवर्षी दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर दाखल होतात. उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी यावर्षीही शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. तयारी पूर्ण झालेली असतानाच, सोलापूरहून आलेले बृजेश शिवानंद कुडले हे पहिले शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल झाले आहेत.
बृजेश कुडले हे आपल्या मुलासोबत मेळाव्यासाठी आले असून, त्यांनी व्यासपीठासमोरील पहिली सीट मिळवली आहे. उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी दरवर्षी येतो, यावर्षीही आलो आहे, असे त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आक्रमक भूमिकेत असल्याने, आजच्या भाषणातून ते ज्ञानेश कुमारांचा राजीनामा किंवा संविधान हत्येसारख्या विषयांवर काय बोलतात, याची उत्सुकता बृजेश कुडले यांना आहे. इतर मेळाव्यांपेक्षा या दसरा मेळाव्याला मोठी गर्दी होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आज उद्धव ठाकरे काय संबोधित करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
