‘उदय सामंतांचा ‘तो’ धंदाच, ते कोणत्याही थराला जाऊ शकतात’, उपमुख्यमंत्रिपदावरून ठाकरेंच्या बड्या नेत्याचा घणाघात
शिवसेनेचे नेते हे ऑपरेशन टायगर चालवत नाहीये हे खरंतर ऑपरेशन कोल्हा आहे. दुसऱ्यांचे आमदार, खासदार पकडायचे आणि बळजबरीने भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं हा यांचा धंदा सुरू असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय.
ठाकरे गटाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. इतकंच नाहीतर भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, असं शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. यावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांना सवाल केला असता त्यांनी उदय सामंत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे. ‘सध्या उदय सामंतांचा हा धंदाच सुरू झालाय. उदय सामंतांना स्वतःच्या माध्यमातून आपल्याकडे सगळ्यांना जमा करायचं आणि उद्या एकनाथ शिंदे यांच्यासमोर पर्याय ठेवायचा. सध्याचं असणारं उपमुख्यमंत्रिपद आपल्या पदारात पाडून घ्यायचं. हा उदय सामंतांचा धंदा आहे. उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी त्यांचे विचार महत्त्वकांक्षी आहे.’, असे म्हणत विनायक राऊतांनी उदय सामंतांवर टीकास्त्र डागलंय. इतकंच नाहीतर ते कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात हे पूर्वीच्या अनुभवातून समोर आलं आहे. भाजपच्या माध्यमातून जास्तीत जास्त आमदार आपल्या पक्षात घ्यायचे आणि मग उदय सामंत यांनाच उपमुख्यमंत्री बनवायचं असा घाट भाजपने घातलेला आहे आणि उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागेल म्हणून उदय सामंत हे देखील तितक्या शिताफिने काम करत आहेत ते महत्त्वाकांक्षी आहेत, असे म्हणत विनायक राऊत यांनी सामंतांवर हल्लाबोल केलाय. तर शिवसेनेचे नेते हे ऑपरेशन टायगर चालवत नाहीये हे खरंतर ऑपरेशन कोल्हा आहे. दुसऱ्यांचे आमदार, खासदार पकडायचे आणि बळजबरीने भीती दाखवून त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं हा यांचा धंदा सुरू असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय.