Vaishnavi Hagavane Case : वैष्णवीचं बाळ इतके दिवस कुठे होतं? बाळाला सांभाळणारं पवळे कुटुंब कोण?
Vaishnavi Hagawane Case Updates : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. तिचं बाळ सध्या कुटुंबाकडे सोपवण्यात आलं आहे. मात्र इतके दिवस हे बाळ कोणाकडे होतं याबद्दल आता मोठी माहिती समोर आली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे यांची ती सून होती. या प्रकरणाने उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी आता हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मात्र या संपूर्ण गोंधळात वैष्णवीचं 9 महिन्यांचं चिमूकलं बाळ कुठे आहे असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला पडला होता. काल वैष्णवीच्या आई-वडिलांनी आपल्या नातवाबद्दल चिंता देखील व्यक्त केली होती. त्यानंतर आज हे बाळ अखेर कसपटे कुटुंबाकडे सुपूर्त केलं आहे.
दरम्यान, इतके दिवस हे बाळ कुठे होतं? याबद्दल अजूनही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एकीकडे अज्ञात इसमाणे फोन करून महामार्गावर बाळ आमच्या ताब्यात सोपवलं असं वैष्णवीचे काका सांगत असतानाच दुसरीकडे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणे याचा मावस भाऊ अमित पवळे याने बाळ इतके दिवस आमच्याकडे होतं, असा दावा केला आहे. टीव्ही9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधतान अमित पवळे म्हणाले की, हे प्रकरण घडलं त्यानंतर वैष्णवीचं बाळ त्याच्या आत्त्याकडे होतं. त्यानंतर नीलेश नावाच्या इसमाकडे हे बाळ होतं. पण बाळ कोणत्यातरी नातेवाईकाकडे असावं म्हणून नीलेश नावाच्या या इसमाने ते बाळ आमच्याकडे दिलं. आम्ही ते इतके दिवस सांभाळलं. त्यानंतर आज सकाळी माझे आई वडील या बाळाला घेऊन पोलिसात गेले आहेत, असं अमित पवळे यांनी म्हंटलं आहे.