Corporator Post Crore Bid : चर्चा तर होणारच…नगसेवक पदासाठी गावकीनं केला लिलाव, एका जागेसाठी ‘इतक्या’ कोटींची बोली!
नगरसेवक पदासाठी कोटीची बोली लावण्यात आली. पुण्याच्या राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीत एक प्रभागामध्ये लिलाव केल्याची चर्चा होतेय. 'गाव करील ते राव काय करील', या म्हणीप्रमाणे गावाच्या विरोधात जायची हिंमत कोणताच उमेदवार दाखवू शकला नाही. सर्वांनी प्रस्ताव मान्य केला.
राजगुरुनगर नगर परिषद मधील एक नंबरच्या प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी गावकीने लिलाव केल्याची चर्चा असून, हा लिलाव सर्वसाधारण जागेसाठी एक कोटी दोन लाख , तर महिला राखीव जागेसाठी २२ लाखांवर गेल्याची माहिती आहे. राजगुरुनगर परिषदेच्या एक नंबर प्रभागामधील गावकऱ्यांनी वेगळा निर्णय घेतला. निवडणुकीत अनेक उमेदवार उभे राहणार आणि पैसे खर्च करणार, त्यापेक्षा प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू, असे त्यांनी ठरवले.
मात्र बिनविरोध निवडीसाठी कोणी माघार घ्यायला तयार होईना गावकऱ्यांनी अजब तोडगा काढला. त्यांच्या प्रभागातून सर्वसाधारण व महिला राखीव जागेवरचे दोन्ही उमेदवार लिलावाद्वारे निवडायचे. जे उमेदवार या पदांसाठी जास्त बोली लावतील, त्यांना इतर सर्व उमेदवारांनी पाठिंबा देऊन आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यायचे, असे ठरले आणि झालेही तसेच इतरांनी भरलेले अर्ज ही मागे घेतले. या लिलावासाठी गावच्या मंदिरात सर्व उमेदवार आणि गावकरी जमले आणि हा लिलाव पार पडला.

