Vinod Ghosalkar : ..अन् राऊतांच्या बोलण्याने विनोद घोसाळकरांचे डोळे पाणावले; असं काय घडलं?
Sanjay Raut - Vinod Ghosalkar : विनोद घोसळकर यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान, राऊत पत्रकारांशी बोलत असताना घोसळकर यांचे डोळे पाणावले होते.
मुलाच्या आठवणीने विनोद घोसाळकर हे भावुक झाल्याचं आज बघायला मिळालं आहे. शिवसेना उबाठा गटाचे खासदार पत्रकारांशी बोलत असताना विनोद घोसाळकर यांचे डोळे पाणावले. भाजप-शिंदेंकडून घोसाळकर कुटुंबावर दबाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, विनोद घोसाळकर मला भेटले. आताच त्यांची आणि माझी चर्चा झाली. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसैनिक आणि आता उपनेते आहेत. त्यांच्या घरात त्यांच्या मुलाचा एक दुर्दैवी प्रसंग घडला. त्यांच्या सुनबाई शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. खरंतर मला लाज वाटते. भारतीय जनता पक्षाची आणि शिंदे गटाची, या ही परिस्थितीत ते त्या मुलीला फोन करुन आमच्या पक्षात या असे म्हणतात. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका पित्याने आपला मुलगा गमावला, मुलीने आपला नवरा गमावला त्यांच्या पक्ष प्रवेशाची कृत्य करता.. लाज वाटली पाहिजे. अशा लोकांना निर्घृण लोकं आहेत ही. हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे. विनोद घोसाळकर आमच्या पक्षात आहेत. त्यांच्या सुनबाई आमच्या पक्षात आहेत, असे खडेबोल राऊतांनी भाजप आणि महायुती सरकारला सुनावले आहेत. यावेळी राऊत बोलत असताना विनोद घोसाळकर यांचे डोळे मुलाच्या आठवणीने पाणावलेले दिसून आले.

