Sanjay Raut : सही करताना झोपेत असतात का? राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर घणाघात
Sanjay Raut Slams Ravindra Chavan : खासदार संजय राऊत यांनी कुंडमळा पूल दुर्घटनेवरून मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
कुंडमळा पुल दुर्घटनेवरून शिवसेना उबाठा गट खासदार संजय राऊत यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. 8 कोटीऐवजी 80 हजार उल्लेख असलेल्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांची सही आहे. चव्हाण झोपेत सही करतात का? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी यावेळी उपस्थित केला आहे. भाजपच्या मावळ तालुकाध्यक्ष भेगडेंना रवींद्र चव्हाण यांनी पत्र दिलं आहे. त्यात 80 हजार रुपयांचा उल्लेख असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
यावर आज प्रसार माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कुंडमळा पुलाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकामाला मंजुरी दिली. या पुरासाठी 8 कोटी मंजूर केले. मात्र, मंत्री महोदयांनी 80 हजारांच्या पत्रावर स्वाक्षरी केली. एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे. इंद्रायणी नदीत पूल कोसळून किमान 40 जण वाहून गेले आहेत. या पुलासाठी 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणतात. मात्र, संबधित मंत्र्याचे पत्र पहा, एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मुर्ख बनवले जात आहे. हे फडणवीसांचे राज्य आहे, असे चालायचेच, अशा शब्दात त्यांनी मंत्री चव्हाण यांच्यावर निशाणा साधत मंत्र्यांचे पत्र देखील माध्यमांना दाखवले.