HSRP नंबर प्लेट म्हणजे नेमंक काय? तुमच्याकडच्या वाहनासाठी बंधनकारक तर नाही ना!
तुमच्याकडे असलेलं वाहन 2019 च्या आधीचं असेल तर तुम्हाला नंबर प्लेट बदलावी लागेल. पण जी नंबर प्लेट बसवायची आहे त्याच्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. अन्य राज्य आणि महाराष्ट्र या शुल्कात मोठी तफावत आहे.
तुम्ही कोणतं वाहन चालवता किंवा तुमच्या मालकीचं कोणतं वाहन आहे का? तसं असेल तर लक्ष देऊन पाहा आणि कान उघडे ठेवून ऐका. परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली. सुरुवातीला 31 मार्च ही शेवटची तारीख होती. पण आता ती एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. वाहनंना या प्रकारच्या नंबर प्लेट लावण्यामागचा उद्देश चांगला असला तरी त्याच्या शुल्कावरून गंभीर आरोप सुरू झाले. परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटची किंमत जास्त असल्याने वाहनधारकांकडून नाराजी आणि संताप व्यक्त होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर हा 1200 कोटींचा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप केलाय. खासदार सुप्रिया सुळेनी ट्विट करत या निर्णयाला विरोध केलाय. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित जनतेची लूट थांबवण्याची मागणी केली आहे.
हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट नेमकी कशी?
एचएसआरपी ही नंबर प्लेट अॅल्युमिनियम पासून तयार केली जाते. होलोग्राम स्टिकर सह ही नंबर प्लेट येते. वाहनाचा इंजिन आणि चेसीसचा नंबर त्यावर लिहिलेला जातो. नंबर युनिक असून तो प्रेशर मशीनने लिहिलेला जातो.
कोणत्या वाहनांना एचएसआरपी बंधनकारक?
2019 पूर्वीच्या सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ही नंबर प्लेट बंधनकारक. 30 एप्रिलपूर्वी नंबर प्लेट बसवली नाही तर दंड बसणार आहे. नंबर प्लेटमध्ये छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणे, वाहनांची ओळख पटवणे, वाहन चोरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.