कराडचे आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची मागणी

आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची (Demand of Ministership to Balasaheb Patil) मागणी होत आहे.

कराडचे आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची मागणी

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत कमबॅक करत राज्यात अनेक ठिकाणी यश मिळवले. यात पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रवादीने आपली विशेष छाप सोडली. आता आमदारकीचा रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची (Demand of Ministership to Balasaheb Patil) मागणी होत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कराड दौऱ्यात साकडे घालण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

राज्यात शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यात कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. बाळासाहेब पाटील हे 1999 पासून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

कराड उत्तर हा माजी मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार अशी ओळख असणारे यशवंतराव चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. राज्यातील अनेक दिग्गज नेते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जात असताना बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले भाजपमध्ये गेल्याने आणि कोरेगावात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादीला मोठा झटका बसला. त्यामुळे बाळासाहेब पाटील मंत्रिपदासाठी साताऱ्यातून मोठे दावेदार आहेत. त्यामुळे गेली 20 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर एकनिष्ठ राहणाऱ्या बाळासाहेब पाटील यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *