
Andhra Pradesh Cow Plastic: देशात पशुधनाची कमतरता आहे. तर अनेक शहरात आणि गावांमध्ये भटक्या गुराढोरांची संख्याही कमी नाही. ही जनावरं दिवसभर रस्त्यावर ठाण मांडून बसतात आणि रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असलेल्या अन्नावर ताव मारतात. देशातील अनेक शहरात भटक्या गायी, बैलांची संख्या वाढत आहे. त्याचा वाहनधारकांना कायम त्रास होतो. पण या मुक्या जनावरांच्या वेदना कुणालाही दिसत नाही. अनेकजण, हॉटेल चालक प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्न फेकून देतात. अन्नाच्या शोधात असलेल्या गायी हे अन्न प्लास्टिक पिशवीसह गिळतात. पण यामुळे त्यांचा जीव संकटात सापडत आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.
पोटातून काढले 52 किलो प्लॅस्टिक
आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यामधील मछलीपट्टनम हे शहर आहे. येथे रस्त्यांवर फिरणाऱ्या गुरांची मोठी समस्या आहे. यातील एक गाय पशुवैद्यकीय पथकाच्या निदर्शनास आली. ती आजारी होती. मग पशुवैद्यकीय तज्ज्ञ दीपक आणि हेमंत यांच्या पथकाने या गायीचे पोट तपासले. एक्सरे मध्ये या गायीच्या पोटात बरंच काही साचलेलं आढळलं. हे प्लॅस्टिक असल्याचे समोर आले. त्यानंतर या पशुवैद्यकीय पथकाने गायीची शस्त्रक्रिया केली. तेव्हा त्यांनाही धक्का बसला.
या गायींच्या पोटातून पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी 52 किलो प्लॅस्टिक आणि कचरा बाहेर कढला. बऱ्याच दिवसांपासून गायीच्या पोटात हा कचरा साचलेला होता. या प्रकारामुळे रस्त्यावरील भटक्या प्राण्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या गायीची तब्येत आता सुधारत आहे. शहरांमध्ये चाऱ्याचा प्रश्न बिकट आहे. त्यामुळे या गायी रस्त्याच्या कडेला, कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील अन्न शोधतात. त्यावेळी त्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि कचरा ही गिळतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पशुसंवर्धन आणि पालिका विभागाने पुढे यावे
प्राणी प्रेमींनी पशुवैद्यकीय तज्ज्ञांचे आभार मानले आहे. त्यांनी इतर भटक्या गायी आणि प्राण्यांची सुद्धा शस्त्रक्रिया करण्याचा आग्रह धरला आहे. शहरांमध्ये रस्त्यांवर फिरणाऱ्या गायी, बैल आणि इतर प्राण्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा येतो. अनेकदा अपघात होतो. जीवितहानी सुद्धा होते. काहीजण भाकड जनावरं रस्त्यावर सोडून देतात. तर काही जण अशी जनावरं खाटकाला विकतात. या दोन्ही प्रकरणात पशुसंवर्धन आणि स्थानिक प्रशासनाने मार्ग काढावा आणि या मुक्या जीवांचा जीव वाचवावा अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक प्राण्यांचे जीव वाचतील असे प्राणी प्रेमींचे म्हणणे आहे.