नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात (Budget 2022) मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी बाजाराप्रमाणे त्यांच्यामध्ये बदल घडवावेत यासाठी मोदी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी सादर करत असलेल्या या अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी (Agriculture Budget 2022) मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. शेतमालाचे मूल्यवर्धन करण्यासाठी गुंतवणूक योजना जाहीर केली जाऊ शकते. शेतकऱ्यांना यासाठी अनुदान देखील जाहीर होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार सरकार शेत मालाचे मूल्यवर्धन आणि बॅकवॉर्ड लिंकेजेस यांच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी गुंतवणुकीचं सहाय्य करण्याची शक्यता आहे. यामुळे देशात शेतकऱ्यांना निर्यात करण्यासाठी मदत होईल आणि बाजारात शेतमाल पोहोचवण्यासाठी देखील सुलभता येईल, अशी माहिती सरकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे.