शेतकऱ्यांनी जगायचं कसं? या राज्यात एक किलो कांदा अवघ्या 30 पैशात, महाराष्ट्रातील भाव काय?
कुरनूल जिल्ह्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण टोमॅटो आणि कांद्याच्या किमती खूप घसरल्या आहेत, त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. या ठिकाणी कांदा फक्त 30 पैसे किलो दराने विकला जात आहे.

आपल्या देशातील शेतकऱ्यांना नेहमी त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांवर कांदा फुकट विकण्याची वेळ आली आहे. कुरनूल जिल्ह्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहेत. कारण टोमॅटो आणि कांद्याच्या किमती खूप घसरल्या आहेत, त्यामुळे शेती करणे अवघड झाले आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची काढणीही केलेली नाही. तसेच काही शेतकर्यांनी पिके रस्त्याच्या बाजूला फेकून दिली आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे कष्ट आणि भांडवल वाया गेले आहे.
कुरनूलमध्ये कांद्याचे भाव इतके घसरले आहेत की एक किलो कांद्याची किंमत फक्त 30 पैसे इतकी आहे. गेल्या वर्षी कांद्याची किंमत 6000 रुपये प्रति क्विंटल होती. मात्र यावेळी ती फक्त 30 रुपये प्रति क्विंटल इतकी आहे. त्यामुळे कांदा पिकामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक वाया गेले आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.
व्यापारी कांदा खरेदी करत नाहीत
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने मार्कफेडमार्फत 1200 रुपये प्रति क्विंटलच्या आधारभूत किमतीने कांदे खरेदी करण्यास सुरुवात केली होती. याअंतर्गत आतापर्यंत 5000 टन कांदा खरेदी करण्यात आला आहे, यातील सुमारे 2000 टन कांदा राज्याच्या इतर भागात आणि हैदराबादला पाठवण्यात आला आहे. मात्र उर्वरित 3000 टन कांदा बाजारात पडून आहे. हा कांदा लिलावाद्वारे व्यापाऱ्यांना विकला जात आहे.
लिलावात कांद्याची किमान किंमत केवळ 30 रुपये प्रति क्विंटल ठेवण्यात आली आहे. याचाच अर्थ एक किलो कांदा फक्त 30 पैशांना मिळत आहे. कांद्याची किंमत इतकी कमी असूनही व्यापारी कांदे खरेदी करताना दिसत नाहीत. तसेच शेतकऱ्यांकडे जो कांदा आहे तो आता खराब व्यायला लागला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा फेकून द्यायला सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रात कांद्याचा भाव काय आहे?
महाराष्ट्रातही कांद्याला कमी भाव आहे. आज (15 सप्टेंबर2025) महाराष्ट्रातील कांद्याचा सरासरी घाऊक बाजारभाव सुमारे 14 रुपये प्रति किलो आहे. राज्यातील शेतकरी कांद्याचा दर वाढण्याची वाट पाहत आहेत. मात्र गेल्या काही काळापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही.
