चिंताच मिटली… शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार 2000 रुपये? केंद्र सरकारच्या हालचाली सुरू
PM किसान योजनेचा 24 वा हप्ता दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त स्थिती पाहता केंद्र सरकार ₹2000 चा हा हप्ता लवकर देण्यावर विचार करत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मात्र, हप्ता खात्यात जमा होण्यासाठी eKYC, आधार लिंकिंग व नोंदणी अचूक असणे आवश्यक आहे.

PM Kisan 24th Installment : सध्या देशात उत्सवाचा सीजन सुरू आहे. त्यातच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बळीराजाला मदत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. बळीराजाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता दिवाळीपूर्वीच देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत दरवर्षी पात्र शेतकरी कुटुंबाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. 2 हजार रुपये तीन टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. या आधी सरकारने योजनेचा 23 वा हप्ता 20 जून रोजी दिला होता. याला चार महिने झाले असून शेतकऱ्यांना आता पुढच्या हप्त्याची आशा लागून राहिली आहे. हा हप्ता दिवाळीपूर्वी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
पीएम किसान योजनेच्या नियमानुसार प्रत्येक चार महिन्यानंतर एक हप्ता दिला जातो. आधीचा हप्ता देऊन चार महिने झाले आहेत. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरीपर्यंत सरकार 24 वा हप्ता शेतकऱ्यांना देण्याची शक्यता आहे. कृषी विभागाचे उप कृषी संचालक निलेश चौरसिया यांनी याबाबतचे संकेत आधीच दिले आहेत. पुढचा हप्ता ऑक्टोबरमध्ये येऊ शकतो. 8 नोव्हेंबर रोजी दिवाळी आहे. त्यामुळे हा हप्ता त्यापूर्वीच दिला जाणार आहे, असं चौरसिया यांनी म्हटलं होतं.
दरम्यान, दिवाळीच्या आधीच हा हप्ता आल्यास शेतकऱ्यांसाठी हे मोठं दिवाळी गिफ्ट ठरणार आहे. मात्र, सरकारकडून अजून रकम वितरीत करण्याची पक्की तारीख ठरलेली नाहीये. मात्र, सोशल मीडियावरून जे दावे केले जात आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका. तुमची फसवणूक होऊ शकते, असं आवाहन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
हप्ता का रखडू शकतो?
अनेकदा सरकार पैसे पाठवते पण खात्यात ते पोहचत नाही. तुम्ही किसान योजनेशी संबंधित अटी आणि शर्ती पूर्ण केल्या नसतील तर तुमचा 24 वा हप्ता अटकू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. तुमची हप्त्याशी संबंधित प्रक्रिया अर्धवट राहिली नाही ना? याची खातरजमा करून घ्या. काही गोष्टी बारकाईने चेक केल्या पाहिजे. तुमचं रजिस्ट्रेशन पाहून घ्या. त्याची माहिती घ्या. ते योग्य आहे की नाही याची खातरजमा करून घ्या. तुमची ईकेवायसी प्रक्रिया झाली की नाही याचीही खात्री करून घ्या. शेतीशी संबंधित रेकॉर्डची सत्यता पडताळून पाहा. तसेच तुमचं आधारकार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे सुद्धा सरतेशेवटी चेक करून घ्या.