शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?

Farmer Loan Waiver : आधार केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आज आपण आधार व्हिरिफिकेशन प्रक्रिया कशी करायची याची माहिती जाणून घेऊयात.

शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं? कोणती कागदपत्रे लागतात?
Farmer Aadhar KYC
Image Credit source: Google
| Updated on: Aug 24, 2026 | 5:18 PM

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दुसरा हफ्ता वितरित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात हा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यात आला. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत होणार आहे. मात्र असं असलं तरी अद्यापही आधार केवायसी न केल्यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. आज आपण आधार व्हिरिफिकेशन प्रक्रिया कशी करायची याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील दुसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांसाठी 4 हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून 6 लाख 20 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र आधार व्हिरिफिकेशन न केल्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.

कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे

शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे आणि ॲग्रीस्टॅकवर फार्मर आयडी नोंदणी अनिवार्य आहे. पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक व विशिष्ट क्रमांकासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन बायोमेट्रिक किंवा ओटीपीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

आपले सरकार सेवा केंद्र किंवा बँकेत आधार व्हेरिफिकेशन करता येणार

सर्वप्रथम ग्रामपंचायत किंवा बँकेच्या माध्यमातून कर्जमाफीच्या यादीत आपले नाव व विशिष्ट क्रमांक पहा. त्यानंतर जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत जा. बोटांचे ठसे किंवा मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. वयस्कर किंवा ठसे उमटत नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वारसदारांच्या ठशांची किंवा विशेष पर्यायाची सोय देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी 20 हजार 552 कोटींची तरतूद

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात 20 हजार 552 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी आतापर्यंत 11 हजार कोटी रुपयांच्या वितरणाला मंजूरी देण्यात आली आहे. यापूर्वी 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,028 कोटी 70 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. कर्जमाफीचा प्रत्येक पात्र शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us