कांद्याच्या सानुग्रह अनुदानावर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणेवर शेतकरी स्पष्टच बोलले…

गेल्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज होते. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली त्यावर नाशिकच्या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कांद्याच्या सानुग्रह अनुदानावर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणेवर शेतकरी स्पष्टच बोलले...
Image Credit source: Google
| Edited By: | Updated on: Mar 13, 2023 | 2:00 PM

लासलगाव, नाशिक : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा मुद्दा हा चांगलाच गाजत आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाल्यानं ठिकाणी निदर्शने केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचेच पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पाहायला मिळाले. विरोधकांनी कांदा हा प्रश्न चांगलाच लावून धरल्याने सरकारला खांद्याचा संदर्भात अनुदान देण्याची घोषणा करावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेमध्ये कांद्याला सानुग्रह अनुदान देत असल्याची घोषणा केली. कांद्याला तीनशे रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याच्या अनुदानाची घोषणा करत असतांना विरोधकांना टोला लगावला होता. यावेळी शिंदे म्हणाले तुम्ही शेतकऱ्यांना फक्त गाजर दाखवली आम्ही मात्र गाजराचा हलवा दिला असा टोला लगावला आहे.

मात्र, ज्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही घोषणा झाली, त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र या घोषणेवर नाराजी व्यक्त केली आहे. जवळपास पाचशे ते सातशे रुपये तोटा सहन करून कांदा विकावा लागतोय इथे तीनशे रुपये अनुदान म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली असून एक हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केल्याची भावना शेतकऱ्याकडून व्यक्त केली जात आहे.

खरंतर कांद्याला 600 ते 700 रुपये पर्यंत भाव मिळत आहे. आणि कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च कमीत कमी बाराशे रुपये प्रतिक्विंटल हा खर्च येतोय. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे रुपयावरून अधिकचा तोटा सहन करावा लागत आहे.

असे असतांना जिथे हजार रुपये अनुदान द्यायला हवे होते, तिथे अवघ्या तीनशे रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांची या सरकारने फसवणूक केल्याची भावना नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमधील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत हा निर्णय रद्द करून एक हजार रुपये पर्यन्त अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे. तरच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशी भावना व्यक्त करत असून विरोधी पक्षांनी हा मुद्दा आणखी लावून धरायला हवा अशीही मागणी शेतकरी करीत आहे.

त्यामुळे कांदा मुद्दा क्षमतो की आणखी तापतो हे पाहणं महत्वाचे ठरणार असून शेतकरी अद्यापही नाराज असल्याचे चित्र आहे.