
देशातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. लहरी हवामानामुळे शेतीचे उत्पादन कमी-अधिक होते. शेतकऱ्यांचा अनेकदा खर्चही भरून निघत नाही. वय वाढल्यावर शेतीत पूर्वीसारखं काम करता येते नाही. त्यातच उत्पन्नही घटते. अशावेळी मदतीचा हात लागतो. या बाबी लक्षात घेत केंद्र सरकारने पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेतंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरमहा पेन्शन, निवृत्तीवेतन देण्यात येते. त्यामुळे त्यांना एक आर्थिक हातभार लागतो. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. या योजनेत अगोदर शेतकऱ्यांना एक ठराविक रक्कम दरमहा जमा करावी लागते. ही रक्कम जमा झाली की, वयाच्या साठीनंतर पेन्शन लागू होते. जितक्या कमी वयात या योजनेत नोंद कराल तितका कमी प्रीमियम येतो आणि पेन्शनचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अशी आहे प्रक्रिया?
शेतकऱ्यांना किती मिळते निवृत्तीवेतन?
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेतंर्गत पात्र शेतकऱ्यांना 60 वर्षे पूर्ण झाल्यावर 3 हजार रुपयांची मासिक पेन्शन, निवृत्तीवेतन मिळते. म्हणजे वार्षिक 36 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. ही रक्कम शेतकऱ्यांना औषधी आणि काही खर्चासाठी कामी येते. त्यामुळे उतारवयात त्यांना थोडासा आर्थिक हातभार लागतो. या योजनेसाठी काही अटी आणि शर्तींची पुर्तता करावी लागते. त्यानंतर निवृत्तीवेतन निश्चित होते. त्यासाठी शेतकऱ्यांना मासिक 55 ते 200 रुपयांपर्यंतचा हप्ता जमा करावा लागतो.
अर्ज करणार तरी कसा?
किसान मानधन योजनेसाठी अर्ज करावा लागतो. त्यासोबत आधार कार्ड, बँकेचे पासबुक, वयाचा दाखला जोडावा लागतो. जवळच्याच महा ई सेवा केंद्रावर आधार क्रमांकावरून या योजनेसाठी नोंदणी करावी लागते. नोंदणी झाल्यावर शेतकऱ्यांना एक निश्चित योगदान राशी दरमहा जमा करावी लागते.
शेतकऱ्यांच्या वयाच्या आधारे हा प्रीमियम ठरविण्यात येतो. त्याआधारे दरमहा ही रक्कम योजनेत जमा होते. शेतकरी जितक्या लवकर या योजनेसाठी नोंदणी करेल, तितका त्याचा प्रीमियम कमी होतो. या योजनेत सरकार प्रीमियम इतकी रक्कम जमा करते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर दरमहा 3 हजार रुपयांची पेन्शन मिळते.