पोल्ट्री उद्योगाला मोठा दिलासा मिळणार,भारताने विकसित केली कोंबड्यांसाठीची H5N1 बर्ड फ्लूवरील पहिली स्वदेशी लस

भारताने कोंबड्यांसाठीची पहिली स्वदेशी H5N1 बर्ड फ्लूवरील लस विकसित केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या लसीचे अनावरण करण्यात आले.

पोल्ट्री उद्योगाला मोठा दिलासा मिळणार,भारताने विकसित केली कोंबड्यांसाठीची  H5N1 बर्ड फ्लूवरील पहिली स्वदेशी लस
H5N1 bird flu vaccine
| Updated on: Nov 20, 2026 | 10:14 PM

कोंबड्यांना होणाऱ्या H5N1 या बर्ड फ्लूच्या विषाणूमुळे लाखो कोंबड्याचा मृत्यू होऊन पोल्ट्री उद्योगाची हानी होत असते. आता या कोंबड्यांना सतावणाऱ्या H5N1 या बर्ड फ्लूच्या विषाणूविरोधात भारताने पहिली स्वदेशी लस विकसित केली आहे. या लसीचे अनावरण मंगळवारी भोपाळ येथे करण्यात आले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या ( ICAR ) अंतर्गत येणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हाय सिक्युरिटी अॅनिमल डिसीजेस ( NIHSAD ) येथील शास्त्रज्ञांनी ही लस विकसित केली आहे. विशेष म्हणजे या लसीच्या एका डोसची किंमत अवघी १ ते २ रुपये असणार आहे. पोल्ट्री क्षेत्रातील उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना या लसीचा मोठा फायदा होणार आहे. रोगप्रतिबंधक उपाययोजना अधिक मजबूत करण्यासोबतच या क्षेत्राला होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी ही लस महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

“प्रति डोस १ ते २ रुपये किंमत असलेली ही लस बर्ड फ्लूच्या या विशिष्ट प्रकारावरील जगातील पहिलीच लस आहे. पोल्ट्री क्षेत्रातील रोगप्रतिबंधक उपाययोजना अधिक प्रभावी करण्यास, लाखो कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यास आणि प्राण्यांच्या रोगांमुळे होणारे मोठे आर्थिक नुकसान कमी करण्यात या लसीची मोठा फायदा होईल असे NIHSAD मधील एका शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

Loading...

या संशोधनामागील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचा गौरव ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला आहे. ज्या ठिकाणी ही लस विकसित झाली, त्याच ठिकाणी या शास्त्रज्ञांचा सन्मान होणे आवश्यक असल्याचे यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे.

या संशोधनाच्या संपूर्ण कालावधीत शास्त्रज्ञांनी अत्यंत कठोर जैवसुरक्षा नियमांचे पालन करावे लागले होते. प्रयोगशाळेत प्रवेश करण्यापूर्वी आणि बाहेर पडल्यानंतर त्यांना विशेष निर्जंतुकीकरण प्रक्रियेतून जावे लागत होते. तसेच दररोज अंघोळीसाठी जवळपास १२० लिटर पाण्याचा वापर करावा लागत होता. संशोधन सुरू असताना संशोधकांना त्यांच्या घरी पाळीव प्राणी ठेवण्यासही मनाई करण्यात आली होती.

भारतात महाराष्ट्रातील नवापूर येथे पहिला उद्रेक

बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची गरज काही वर्षांत अधिक तीव्र झाली होती.भारतात बर्ड फ्लूचा पहिला उद्रेक २००६ मध्ये महाराष्ट्रातील नवापूर येथे झाला होता. या उद्रेकात जवळपास १० लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी अनेक किलोमीटर पर्यंत लाखो पक्ष्यांना मारून त्यांना जमिनीत पुरण्यात आले होते. त्यानंतर भारतात बर्ड फ्लूचे ५०० हून अधिक उद्रेक झाले आहेत.

मानवात संघर्गाचा धोका

या आजाराचा भारतीय पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे. २०२१ मध्ये सुमारे ९ लाख कोंबड्यांचा मृत्यू यामुळे झाला तर यावर्षी आणखी २ लाख पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.या रोगाचा संसर्ग सस्तन प्राणी आणि मानवांमध्येही होण्याचा धोका असल्याने त्याचे प्रभावी नियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे होते.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us