फवारणी पिकांची अन् जीव धोक्यात शेतकऱ्यांचा, अशी घ्या काळजी..!

| Updated on: Nov 15, 2021 | 12:47 PM

सध्या खरिपातील तूर फुलोऱ्यात आहे. असे असतानाच वातावरणातील बदलाचा परिणाम झाल्याने तूरीवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तूरीची ऊंची ही 8 ते 10 फूटापर्यंत वाढली आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकऱ्यांना 'कॉन्टॅक्ट पॉयझानिंग' चा धोका निर्माण झाला आहे.

फवारणी पिकांची अन् जीव धोक्यात शेतकऱ्यांचा, अशी घ्या काळजी..!
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : वातावरणातील बदलामुळे शेती पिकांचे तर नुकसान होतच आहे पण जीव धोक्यात घालून शेतकऱ्यांना शेती पिकांची निगराणी करावी लागत आहे. सध्या खरिपातील तूर फुलोऱ्यात आहे. असे असतानाच वातावरणातील बदलाचा परिणाम झाल्याने तूरीवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तूरीची ऊंची ही 8 ते 10 फूटापर्यंत वाढली आहे. त्यामुळे फवारणी करताना शेतकऱ्यांना ‘कॉन्टॅक्ट पॉयझानिंग’ चा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे योग्य खबरदारी हाच पर्याय असून अनेक शेतकरी याकडे दुर्लक्ष करुन जीव धोक्यात घालत आहेत.

खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आहे. कापूस आणि तूर हीच मुख्य पिके आता शेतामध्ये आहेत. मात्र, सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे तूरीवर मारुका किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे तर फुलगळतीचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे फवारणीची कामे सुरु आहेत. या दरम्यान शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यावी हे आपण पाहणार आहोत.

तूरीची फवारणी करताना अशी घ्या काळजी

* फवारणी करताना अनेक वेळा दुर्घटना होऊनही शेतकरी योग्य ती काळजी घेत नाहीत. त्यामुळे सर्वात प्रथम किटकनाशकावरील डब्यावर किंवा बाटलीवर देण्यात आलेल्या सुचना वाचून त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
* फवारणी दरम्यान, संरक्षक कपडे वापरणे गरजेचे आहे. जसे की, तोंडाला मास्क, हातमोजे, सुरक्षित चष्मा याचा वापर महत्वाचा ठरणार आहे.
* फवारणी यंत्रात किटकनाशके भरल्यानंतर किंवा फवारणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे.
* फवारणी यंत्र, किंवा त्या दरम्यान वापरण्यात आलेली भांडी ही पुन्हा स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
* फवारणी दरम्यान नोझल बंद पडल्यास अनेक वेळा शेतकरी हे तोंडानेच फुंकर मारतात किंवा ओढतात. मात्र, हे धोक्याचे असून शेतकऱ्यांनी पंपाचा वापर करणे गरजेचे आहे.
* किटकनाशके फवारणीचे काम सलग आठ दिवस करु नये किंवा उपाशीपोटी फवारणी केल्यासही आरोग्यासाठी ते धोक्याचे आहे.
* उष्ण व दमट वातावरणात किटकनाशकाची फवारणी केल्यास विषबाधा होण्याची शक्यता असते त्यामुळे वातावरण कोरडे असताना फवारणी करावी तसेच वाऱ्याच्या विरुध्द दिशेने फवारणी केल्यासही धोका असतो.
* हात-पायावर जखम असताना फवारणी केली तर त्या जखमेच्या माध्यमातून विष जाऊन विषबाधा होण्याचा धोका असतो.
* दाट व वाढलेल्या पिकांमध्ये किटकनाशके फवारताना एकाच नोझलचा वापर करावा.
* फवारण्याच्या दरम्यान, काहीही खाऊ नये किंवा बिडी, तंबाखू खाणे टाळावे त्याद्वारेही धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी लहान बाबींचीही काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे.

असे करा तूरीवरील मारुकाचे व्यवस्थापन, अन्यथा उत्पादनात घट

मारुका अळीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात 20 ते 25 ठिकाणी प्रति मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास किटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. शिवाय बुरशीचाही धोका वाढत आहे.
फ्लूबेंडामाइड 20 डब्ल्यूजी 6 ग्रॅम किंवा थायोडीकार्ब 75 डब्ल्यू.पी 20 ग्रॅम किंवा नोवलुरोन 5.25 इंडोक्झाकार्ब 4.50 एससी 16 मिली यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्रा ही तिप्पट करावी. गरज भासल्यास पुन्हा 15 दिवसांनी दुसरी फवारणी करावी.

संबंधित बातम्या :

गायरान जमिन म्हणजे नेमके काय ? काळाच्या ओघात का वाढत आहे अतिक्रमण ?

विमा कंपनी – सरकारच्या वादात शेतकऱ्यांचे मरण, एकाही शेतकऱ्याला ‘या’ कंपनीची भरपाई नाही

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांना आज शेवटची संधी, काय आहेत आधार प्रमाणीकरणातील अडचणी?