Gondia : धान खरेदीत गोलमाल..! एका तासातच 4 लाख 50 हजार क्विंटल धानाची खरेदी, नेमकी भानगड काय?

शेतकऱ्यांकडील शिल्लक धान खरेदीच्या अनुशंगाने मुदतवाढ करण्यात आली आहे. असे असले तरी एकाच खरेदी केंद्रावर तब्बल 4 लाख 50 हजार धानाची खरेदी ते देखील अवघ्या काही तासांमध्ये. त्यामुळे खरेदी केंद्र चालकाने शेतकऱ्यांच्या नोंदी, धानाची खरेदी ही सर्व प्रक्रिया केली तरी कधी असा सवाल उपस्थित होत आहे.

Gondia : धान खरेदीत गोलमाल..! एका तासातच 4 लाख 50 हजार क्विंटल धानाची खरेदी, नेमकी भानगड काय?
धान पीक
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 9:29 AM

गोंदिया : जिल्ह्यातील (Paddy Crop) धान खरेदी केंद्र बंद होऊन देखील शेतकऱ्यांकडे धान हे शिल्लक आहे. शेतकऱ्यांच्या मागणी आणि लोकप्रतिनीधींचा रेटा यामुळे 31 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यंदा (Shopping Center) खरेदी केंद्रावरील अटी-नियमांमुळे ही परस्थिती ओढावली आहे. मात्र, हे नियम केवळ शेतकऱ्यांसाठीच होते का असा सवाल आता उपस्थित होत आहे. कारण एका तासामध्ये तब्बल 4 लाख 50 हजार क्विंटल धानाची खरेदी केंद्राच्या माध्यमातून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे केंद्राने उद्दिष्ट तर साधले पण माल शेतकऱ्यांचा की व्यापाऱ्यांचा असा सवाल उपस्थित झाला आहे. (NAFED) नाफेड कडून उभारली जाणारी खरेदी केंद्र ही शेतकऱ्यांसाठी असतात पण गोंदिया जिल्ह्यामध्ये भलताच प्रकार समोर येत आहे. त्यामुळे खरेदी केंद्राची चौकशी करण्याची मागणी आता शेतकरी आणि स्थानिक लोकप्रतिनीधींकडून होत आहे.

खरेदी केंद्रावर माल शेतकऱ्यांचा की व्यापाऱ्यांचा?

शेतकऱ्यांकडील शिल्लक धान खरेदीच्या अनुशंगाने मुदतवाढ करण्यात आली आहे. असे असले तरी एकाच खरेदी केंद्रावर तब्बल 4 लाख 50 हजार धानाची खरेदी ते देखील अवघ्या काही तासांमध्ये. त्यामुळे खरेदी केंद्र चालकाने शेतकऱ्यांच्या नोंदी, धानाची खरेदी ही सर्व प्रक्रिया केली तरी कधी असा सवाल उपस्थित होत आहे. शिवाय हा माल शेतकऱ्यांचा नसून व्यापाऱ्याचा असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शिवाय ज्या उद्देशाने खरेदी केंद्र उभारली जात आहेत त्याकडे दुर्लक्ष करुन अर्थार्जनाच्या हेतूने असे प्रकार खरेदी केंद्रावर सुरु असल्याचा ठपका शेतकऱ्यांनी ठेवला आहे. त्यामुळे चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आहे.

दोन दिवसांमध्ये होणार चित्र स्पष्ट

जिल्ह्यात धान पिकाला घेऊन शेतकरी त्रस्त आहे. अशातच खरेदी केंद्रावर अनियमितता होत असेल तर दाद मागायची कुणाकडे असा सवाल आहे. खरेदी केंद्रावर एकाच तासांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात धान घेतले गेलेच कसे असा जाब विचारला जात आहे. त्यामुळे ज्या खरेदी केंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त धान्य खरेदी झाली आहे अशांचा अहवाल मागविण्यात आला आहे. दोन दिवसांमध्ये याबाबत स्पष्टता देण्याचे आदेश अपर जिल्हाअधीकारी राजेश खवले यांनी जिल्हा मार्केटींग फेडरेशनला दिले आहे.

धान खरेदीमध्ये मुदतवाढ

यंदा रब्बी हंगामात धानाच्या उत्पादनात वाढ झाली होती. त्यामुळे खरेदी ही नाफेडकडूनच होईल अशी अपेक्षा असताना यंदा ठरवून दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणेच खरेदी होणार अशी अट घालण्यात आली होती. त्यामुळे खरेदी केंद्रांनी आपले उद्दिष्ट साधले की केंद्र बंद केल्याचा प्रकार सबंध जिल्ह्यात झाला होता. परिणामी शेतकऱ्यांकडे धान पीक शिल्लक राहिले. शिवाय बाजारपेठेत कवडीमोल दर असल्याने विक्रीतून नुकसानच हे अटळ होते. त्यामुळे खरेदी केंद्रांची मुदत वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी केल्याने आता जिल्ह्यातील खरेदी केंद्र हे 31 जुलैपर्यंत सुरु राहणार आहेत. मात्र, खरेदी केंद्रावर नियमितता आली तरच शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.