शेतात युरिया टाकण्याची योग वेळ कोणती? सकाळी… संध्याकाळी की पावसापूर्वी? जाणून घ्या
Urea In Farming: शेतात युरिया टाकण्याची योग्य वेळ कोणती आणि पद्धत काय यावर उत्पादनात वाढ होते. उष्णता आणि मुसळधार पावसात युरिया टाकण्याची चूक केल्यास पैसाही वाया जातो आणि फायदा ही होत नाही. कोणत्यावेळी शेतात टाकावा युरिया?

Urea In Farming: शेतात युरियाचा मोठा वापर होतो. पण केवळ युरिया टाकून दमदार पीक हाती येईल अशी हमी कोणी देत नाही. कारण योग्यवेळ आणि योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. अनेक शेतकरी त्यांच्या हिशोब, सवडीप्रमाणे कडक उन्हात आणि कधी कधी पावसाचा अंदाज न घेता युरिया शेतात सर्वदूर टाकतात. त्यामुळे पिकांना त्याचा लाभ होत नाही. युरियाचा मोठा भाग हा मुसळधार पावसाने शेताबाहेर जातो अथवा खराब होतो. त्यामुळे योग्यवेळी युरिया टाकणे अत्यंत आवश्यक आहे.
खर्च वाढतो, उत्पादन नाही
युरिया योग्य वेळी दिला नाही आणि तो खराब झाला तर शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. पण त्याच्या उत्पादन वाढत नाही. जर युरिया योग्य वेळी टाकले तर भुसभुशीत जमिनीत आणि ओलावा असलेल्या जमिनीत ते टाकले तर पिकांना पोषण मिळते. त्यामुळे पीक जोमाने वाढते. त्यामुळे युरिया सकाळी, दुपारी की संध्याकाळी आणि मुसळधार पावसापूर्वी टाकावा की नाही, काय आहे याविषयीचे गणित?
सकाळी, संध्याकाळी केव्हा टाकावा युरिया?
कृषी तज्ज्ञांच्या मते, युरिया सकाळी अथवा संध्याकाळी टाकणे योग्य मानले जाते. कारण यावेळी तापमान कमी असते. मातीतील ओलाव्यामुळे नायट्रोजनचे नुकसान होत नाही. तर दुपारी युरिया टाकल्यास जमीन तापलेली असल्याने, दमट वातावरणामुळे आणि भर उन्हामुळे युरिया खराब होऊ शकतो. त्यातील काही भाग अमोनिया गॅसच्या रुपाने उडून जातो.
त्यामुळे नत्र पीकांना पूर्णपणे मिळत नाही. जर शेतात थोडा ओलावा असेल तर सिंचनानंतर माती ओली राहते. युरियाचा परिणाम अधिक चांगला दिसतो. युरिया टाकल्यानंतर सिंचन केले तर फायदेशीर मानले जाते. कारण नत्र खत जितक्या लवकर मातीत मिसळेल आणि पिकांच्या मुळाशी पोहचले, तितके चांगले असते.
पावसापूर्वी टाकावे की नंतर?
जर हवामान खात्याने हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला तर त्यापूर्वी युरिया टाकणे फायदेशीर मानले जाते. कारण खत टाकल्यानंतर जर पाऊस पडला तर हे खत मातीत चांगल्या प्रकारे मिसळून जाते. पण जर मुसळधार पाऊस पडला तर मात्र खत वाहून जाऊ शकते. युरिया टाकण्याची घाई करू नये. हवामान खात्याचा अंदाज अगोदर समजून घ्या. कारण मुसळधार पावसामुळे खत हे खराब होऊ शकते अथवा पाण्यासोबत शेताबाहेर जाऊ शकते. त्याचा पिकांना कोणताही फायदा होत नाही.
तर शेतात पाणी साचलेले असताना खत टाकणे फायद्याचे ठरत नाही. त्यामुळे हवामानाचा अंदाज घेऊनच युरिया टाकणे चांगले मानले जाते. योग्य वेळ, योग्य मात्रा आणि योग्य प्रमाणात युरिया टाकला तर शेतकर्याच्या खर्च वाचेल. त्याचे श्रम वाचतील.