मुंबई आढावा : युतीचा झेंडा की आघाडी घेणार ‘आघाडी’? ‘वंचित फॅक्टर’ किंचित की प्रभावी?

भाजपकडे 15, तर शिवसेनेकडे 14 जागा असल्यामुळे जागावाटपावरुन रस्सीखेच होणं अटळ आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी दोन आकडी संख्या गाठण्यासाठी उत्सुक आहे

मुंबई आढावा : युतीचा झेंडा की आघाडी घेणार 'आघाडी'? 'वंचित फॅक्टर' किंचित की प्रभावी?
Follow us
| Updated on: Sep 11, 2019 | 1:08 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेवर (Maharashtra Assembly) झेंडा फडकवण्यासाठी मुंबई (Mumbai Assembly seats) जिंकणं राजकीय पक्षांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2019) शिवसेना-भाजप युती (Shivsena BJP) जवळपास निश्चित मानली जात असली, तरी जागावाटपावरुन काथ्याकूट होणार आहे. भाजपकडे 15, तर शिवसेनेकडे 14 जागा असल्यामुळे रस्सीखेच होणंही अटळ आहे. त्यातच मुंबईतून विरोधीपक्षातले कृपाशंकर सिंह, सचिन अहिर यांच्यासारखे बडे चेहरे सध्या सत्ताधारी पक्षांमध्ये आल्यामुळे तिकीट देताना (Mumbai Assembly seats) पक्षप्रमुखांच्या नाकी नऊ येतील. त्याचवेळी नाराजी ओढावल्यास बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.

काँग्रेसच्या (Congress) वाट्याला 2014 मधील विधानसभा निवडणुकीत अवघ्या पाच जागा आल्या होत्या, त्यातील कालिदास कोळंबकरही भाजपवासी झाल्यामुळे काँग्रेसची झोळी आणखीच फाटली आहे. राष्ट्रवादीसारख्या (NCP) पक्षाला मुंबईत खातंही (Mumbai Assembly seats) उघडता आलं नव्हतं. त्यामुळे यंदा त्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. लोकसभा निवडणुकीत वाताहत झाल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा मुंबईत निभाव लागणं कठीण मानलं जातं. आघाडीचं घोंगडंही अद्याप भिजतच आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi VBA) रुपाने नवीन आव्हान सर्वच पक्षांसमोर उभं राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितला मिळालेली मतं पाहता विधानसभेत मुंबईतील काही जागा वंचितच्या पदरी पडण्याची शक्यता वर्तवली जाते. एमआयएमसोबत घटस्फोट झालेला असला, तरी ‘आप’ची साथ लाभल्यास वंचितला थोडाबहुत फायदा होईल. वंचित स्वबळावर लढण्यासही तशी सक्षम दिसते.

एमआयएम (AIMIM) आणि समाजवादी पक्ष (Samajwadi Party) यांचे एक-एक आमदार मुंबईत आहेत. पक्षाच्या नावापेक्षाही आमदारांच्या चेहऱ्याला असलेल्या वलयामुळे त्यांनी जागा जिंकल्या, असं म्हटल्यास वावगं ठरु नये.

मनसेने (Maharashtra Navnirman Sena MNS) 2014 मधील निवडणुकीत होतं-नव्हतं ते सारंच गमावलं. त्यांच्या पदरात एकही आमदार नाही. मनसे यंदा नव्या जोमाने तयारीला लागून निवडणूक लढवणार आहे. मात्र त्यांना भोपळा फोडता येणार का, हे येणारा काळच ठरवेल.

विधानसभेचं मुंबईतील पक्षीय बलाबल

भाजप – 15 शिवसेना – 14 काँग्रेस – 05 समाजवादी पक्ष – 01 एमआयएम – 01 राष्ट्रवादी – 00 मनसे – 00

एकूण – 36

मतदारसंघनिहाय संक्षिप्त आढावा

152 – बोरीवली : भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी 2014 मधील विधानसभा निवडणुकीत बोरीवली मतदारसंघात झेंडा रोवला होता. दणदणीत मताधिक्य मिळवत तावडेंनी शिवसेनेच्या उत्तमप्रकाश अग्रवाल यांचा पराभव केला होता. बोरीवली हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

153 – दहिसर : भाजपच्या मनिषा चौधरी यांनी शिवसेनेचे तत्कालीन आमदार विनोद घोसाळकर यांना 2014 मध्ये पराभवाची धूळ चारली होती. काँग्रेसकडून शीतल म्हात्रे, तर शिवसेनेतून मनसेमध्ये गेलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. घोसाळकरांवर शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, मात्र पुराव्यांअभावी अखेर त्यांची सुटका झाली. दहिसर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो.

154 – मागाठणे : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेला मागाठणे विधानसभा मतदारसंघ बोरीवलीतच येतो. 2014 मध्ये शिवसेनेच्या प्रकाश सुर्वे यांनी भाजपच्या हेमेंद्र मेहता यांचा पराभव केला होता. मनसेचे माजी आमदार प्रवीण दरेकर निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर होते. पराभवानंतर दरेकरांनी भाजपची वाट धरली.

155 : मुलुंड : हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग. 2009 पासून भाजपच्या सरदार तारासिंह यांची मुलुंडमध्ये सत्ता आहे. 54 टक्के मतं मिळवत सरदार तारासिंह यांनी आपली आमदारकी राखली होती. काँग्रेसचे चरण सिंह सप्रा दुसऱ्या, तर शिवसेनेचे प्रभाकर शिंदे तिसऱ्या स्थानावर होते.

156 – विक्रोळी : शिवसेनेच्या सुनील राऊत यांनी मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांचा 2014 मधील निवडणुकीत पराभव केला होता. राष्ट्रवादीकडून संजय दीना पाटील तिसऱ्या क्रमांकावर होते. पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागला होता. विक्रोळी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतं.

157 – भांडुप पश्चिम : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या भांडुप पश्चिममध्ये शिवसेनेचे अशोक पाटील आमदार आहेत. भाजपचे तत्कालीन नगरसेवक मनोज कोटक यांचा पाटील यांनी पराभव केला होता. मनोज कोटक आता ईशान्य मुंबईतून लोकसभेवर निवडून आले आहेत. 2014 मध्ये मनसेचे माजी आमदार शिशिर शिंदे यांचं संस्थानही खालसा झालं होतं. शिंदे यांनी पराभवानंतर शिवसेनेत घरवापसी केली.

158 – जोगेश्वरी पूर्व : हा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग. शिवसेनेचे रविंद्र वायकर सलग दुसऱ्यांदा आमदार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाची जबाबदारी वायकरांकडे आहे. भाजपच्या उज्ज्वला मोडक यांचा वायकरांनी पराभव केला होता.

159 – दिंडोशी : मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू हे शिवसेनेच्या तिकीटावर दिंडोशीतून निवडून आले. काँग्रेसचे राजहंस सिंग, भाजपचे मोहित कंभोज आणि मनसेच्या शालिनी ठाकरे यांना प्रभूंनी चारीमुंड्या चित केलं होतं. दिंडोशी हा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

160 – कांदिवली पूर्व : महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस अतुल भातखळकर यांनी कांदिवलीत दणदणीत मताधिक्य मिळवत विजय मिळवला होता. काँग्रेसचे रमेशसिंह ठाकूर, शिवसेनेकडून खासदार गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर पराभूत झाले होते. हा उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

161 – चारकोप : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचा हा भाग. भाजपच्या योगेश सागर यांनी सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांचा त्यांनी जवळपास 65 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता.

162 – मालाड पश्चिम : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात असलेल्या मालाड पश्चिमेत काँग्रेसचा झेंडा आहे. अस्लम शेख हे सलग दुसऱ्यांदा आमदार आहेत. भाजपचे राम बारोट यांचा अवघ्या दोन हजार मतांच्या फरकाने निसटता पराभव झाला होता. तर शिवसेनेचे डॉ. विनय जैन आणि मनसेतर्फे दीपक पवार रिंगणात होते.

163 – गोरेगाव : महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री असलेल्या भाजपच्या विद्या ठाकूर यांनी शिवसेनेचे दिग्गज नेते आणि तत्कालीन आमदार सुभाष देसाई यांचा पराभव केला होता. पाच हजारांच्या मताधिक्याने ठाकूर निवडून आल्या होत्या. मात्र निकालोत्तर युती झाल्यानंतर सुभाष देसाई यांनाही कॅबिनेटमध्ये उद्योग मंत्रालय सोपवण्यात आलं. गोरेगाव उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात येतं.

164 – वर्सोवा : भाजपच्या डॉ. भारती लवेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार बलदेव खोसा यांना पराभवाची धूळ चारली होती. जवळपास 26 हजारांचं मताधिक्य मिळवत लवेकरांनी विजय मिळवला होता. वर्सोवाही उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

165 – अंधेरी पश्चिम : अंधेरी पश्चिम हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात येतं. भाजपच्या अमित साटम यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार अशोक जाधव यांच्यावर मात केली होती, तीही तब्बल 25 हजार मतांनी. शिवसेनेच्या जयवंत परब यांना फारशी चमक दाखवता आली नव्हती.

166 – अंधेरी पूर्व : शिवसेनेचे रमेश लटके अंधेरी पूर्वेतील आमदार आहेत. काँग्रेसचे तत्कालीन आमदार सुरेश शेट्टी यांच्याकडून 2009 मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा लटके यांनी 2014 मध्ये काढला होता. विशेष म्हणजे भाजपचे सुनिल यादव दुसऱ्या स्थानी राहिले, तर शेट्टी तिसऱ्या स्थानावर गेले होते. हा उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

167 – विलेपार्ले : भाजपच्या तिकीटावर अॅड. पराग अळवणी यांनी 49 टक्के मतं जिंकत आमदारकी मिळवली. काँग्रेसचे तत्कालीन आमदार कृष्णा हेगडे तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. तर शिवसेनेचे शशिकांत पाटकर दुसऱ्या स्थानावर होते. मात्र अळवणी यांना 33 हजारांचं मताधिक्य मिळालं होतं. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

168 – चांदिवली : काँग्रेसच्या मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी सलग दुसऱ्यांदा चांदिवलीमध्ये झेंडा रोवला. शिवसेनेच्या संतोष सिंगचा त्यांनी पराभव केला. चांदिवली हा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

169 – घाटकोपर पश्चिम : राम कदम सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. 2009 मध्ये ते मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते, तर 2014 मध्ये मात्र त्यांनी पक्षांतर करुन भाजपच्या तिकीटावर निवडणूक जिंकली. 2009 मध्ये पूनम राव यांना राम कदमांनी पराभूत केलं होतं. 2014 मध्ये शिवसेनेचे सुधीर मोरे आणि मनसेचे दिलीप लांडे पराभूत झाले. हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

170 – घाटकोपर पूर्व : माजी गृहनिर्माण मंत्री आणि मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष प्रकाश मेहता सलग दुसऱ्यांदा घाटकोपर पूर्वेतून आमदार आहेत. एसआरए घोटाळ्यात आरोपांनंतर मंत्रिमंडळ फेरबदलात मेहतांचं मंत्रिपद गेलं. 2014 मध्ये शिवसेनेच्या जगदीश चौधरी आणि काँग्रेसच्या प्रवीण छेडा यांचा मेहतांना दणदणीत पराभव केला होता. छेडा आता भाजपवासी झाले आहेत. हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

171 – मानखुर्द शिवाजीनगर : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांची सलग दोन वेळा मानखुर्द शिवाजीनगरमध्ये सत्ता आहे. 2014 मध्ये शिवसेनेच्या सुरेश पाटील यांचा आझमींनी पराभव केला होता. हा ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

172 – अणुशक्ती नगर : हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे. राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार नवाब मलिक यांचा शिवसेनेच्या तुकाराम काते यांनी पराभव केला. मलिक यांचा अवघ्या 1007 मतांनी पराभव झाला होता.

173 – चेंबूर : शिवसेनेच्या प्रकाश फातर्फेकर यांनी काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव केला होता. तर रिपाइंचे दीपक निकाळजे तिसऱ्या स्थानावर होते. हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

174 – कुर्ला : शिवसेनेच्या मंगेश कुडाळकर यांनी 2014 मध्ये आमदारकी मिळवली. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या मिलिंद कांबळे यांनी केलेल्या पराभवाचा बदला कुडाळकरांनी घेतला. भाजपचे विजय कांबळे 2014 मध्ये दुसऱ्या स्थानावर होते, तर एमआयएमकडून अविनाश बर्वे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. हा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

175 – कलिना : शिवसेनेच्या संजय पोतनीस यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांना पराभवाची धूळ चारली होती. भाजपच्या अमरजित सिंह यांनी दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतल्याने कृपाशंकर तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. तर सध्या नगरसेवक असलेले कप्तान मलिक चौथ्या क्रमांकावर होते. कृपाशंकर सिंह यांनी नुकताच भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. कलिना हा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

176 – वांद्रे पूर्व : दोन वेळा आमदारकी भूषवलेल्या प्रकाश (बाळा) सावंत यांनी 2014 मध्ये निवडणूक जिंकली. अवघ्या वर्षभरातच प्राणज्योत मालवल्यामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली. शिवसेनेने बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर केली. युतीमुळे भाजपने आपला उमेदवार दिला नाही. मात्र त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे इरेला पेटून रिंगणात उतरले. मात्र जवळपास वीस हजारांच्या मताधिक्यांना राणेंचा पराभव झाला. तृप्ती प्रकाश सावंत पोटनिवडणुकीत आमदारपदी निवडून आल्या. वांद्रे पूर्व हा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

177 – वांद्रे पश्चिम : 2009 पर्यंत काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांची या मतदारसंघावर मजबूत पकड होती. मात्र 2014 मध्ये आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिममध्ये कमळ फुलवलं. 2009 मधील पराभवाचा वचपाही शेलारांनी काढला. 26 हजारांच्या मताधिक्याने आशिष शेलार यांनी बाबा सिद्दीकी यांना हरवलं. वांद्रे पश्चिम हा उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

178 – धारावी : काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत. शिवसेनेचे बाबुराव माने आणि भाजपच्या दिव्या ढोले यांचा गायकवाड यांनी गेल्या वेळी पराभव केला. धारावी हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतं.

179 – सायन कोळीवाडा : भाजपच्या तिकीटावर कॅप्टन तमिळ सेलवन आमदारपदी निवडून आले आहेत. काँग्रेसचे तत्कालीन आमदार जगन्नाथ शेट्टी यांच्याकडून पराभवाचा बदला त्यांनी घेतला. शिवसेनेचे मंगेश सातमकर यांचा निसटता पराभव झाला. हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

180 – वडाळा : सात वेळा आमदार राहिलेले कालिदास कोळंबकर काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. भाजपच्या मिहीर कोटेचा यांच्यावर कोळंबकरांनी निसटता विजय मिळवला होता. शिवसेनेच्या हेमंत डोके यांचाही पराभव झाला होता. कोळंबकरांनी नुकतंच काँग्रेसला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

181 – माहिम : शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या सदा सरवणकर यांनी मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांचा पराभव केला होता. 2009 मधील पराभवाचा वचपाच सरवणकरांनी काढला होता. मात्र त्यावेळी (2009) सदा सरवणकर काँग्रेसकडून रिंगणात होते, तर शिवसेनेकडून अभिनेते आदेश बांदेकर यांनी निवडणूक लढवली होती. माहिम हा दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

182 – वरळी : सुनिल शिंदे हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांना पराभवाची धूळ चारली होती. मात्र यंदा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वरळीतून रिंगणात उतरण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

183 – शिवडी : शिवसेनेच्या अजय चौधरी यांनी तीन वेळा आमदार राहिलेल्या बाळा नांदगावकर (मनसे) यांचा पराभव केला. शिवडी हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

184 – भायखळा : एमआयएमचा मुंबईतील एकमेव आमदार भायखळ्यात आहे. वारिस पठाण यांनी भाजपच्या मधू चव्हाण आणि काँग्रेसचे तत्कालीन आमदार मधुकर चव्हाण आणि अभासेच्या गीता गवळी यांना हरवून आमदारकी मिळवली. हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

185 – मलबार हिल : भाजपचे मंगल प्रभात लोढा हे सलग पाचव्यांदा आमदारपदी निवडून आले आहेत. भाजपचे मुंबई अध्यक्ष असलेले लोढा हे सर्वात श्रीमंत आमदार आहेत. शिवसेनेचे अरविंद दूधवाडकर, काँग्रेसच्या सुशीबेन शाह आणि मनसेच्या राजेंद्र शिरोडकर यांटा लोढांनी पराभव केला होता. हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

186 – मुंबादेवी : काँग्रेसचे अमिन पटेल सलग दुसऱ्यांदा आमदार आहेत. भाजपच्या अतुल शाहा यांचा पटेलांनी पराभव केला होता. हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

187 – कुलाबा : भाजपच्या राज पुरोहित यांनी शिवसेनेच्या पांडुरंग सकपाळ यांचा पराभव करुन आमदारकी मिळवली होती. काँग्रेसचे तत्कालीन आमदार अॅनी शेखरही पराभूत झाले होते. हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाग आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ

Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी (2014 नुसार)

NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी (2014 नुसार)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.