Power Bikes : 1000cc पेक्षा जास्त पॉवरच्या बाईक्सची धूम… विक्रीत मोठी वाढ

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये 1000cc च्या बाईक विक्रीची माहिती समोर आली आहे. त्यात हार्ले डेविडसन, ट्राइंफ आदी दुचाकींच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात केवळ हार्ले डेविडसनचा विचार केल्यास गेल्या एका वर्षात या बाईकच्या विक्रीत तब्बल 100 टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ झालेली दिसून आली आहे.

Power Bikes : 1000cc पेक्षा जास्त पॉवरच्या बाईक्सची धूम… विक्रीत मोठी वाढ
बाईक भारी, बाईक्सची पॉवर भारी, बाईक्सची विक्री पण लईच भारी !
Image Credit source: tatamotorcycle
| Updated on: May 17, 2022 | 4:31 PM

भारतात भलेही 800 सीसीची अल्टो कार खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी असली तरी याच ठिकाणी तब्बल एक हजार सीसीपेक्षा जास्त पॉवर इंजिनच्या बाईक्स घेणाऱ्या बाईक्सप्रेमींची संख्यादेखील कमी नाही. गेल्या वर्षी या बाईक्सच्या लोकप्रियतेत सातत्याने वाढच झालेली दिसून येत आहे. या लेखात आकडेवारीनिहाय यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. दरम्यान, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये एक हजार सीसीच्या बाईक्सच्या (1000cc power bikes) विक्रीची माहिती समोर आली आहे. त्यात हार्ले डेविडसन, (Harley Davidsons) ट्राइंफ (Triumphs) आदी दुचाकींच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यात केवळ हार्ले डेविडसनचा विचार केल्यास गेल्या एका वर्षात या बाईकच्या विक्रीत तब्बल 100 टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ झालेली दिसून आली आहे. भारतीय दुचाकी बाजारात 100 सीसीच्या बाईक्सपासून सुरुवात होते. त्यांनाही आपआपल्या सेगमेंटमध्ये चांगली मागणी आहे. भारतीय दुचाकी बाजारात अनेक सेगमेंटमध्ये दुचाकी उपलब्ध आहेत. त्यांच्या वापरानुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात येत असतो.

हार्ले डेविडसनच्या विक्रीत वाढ

1000cc च्या बाईक विक्रीत हार्ले डेविडसनचा पहिला क्रमांक लागतो. गेल्या आर्थिक वर्षात या बाईकचे 206 युनिट्‌सची विक्री करण्यात आली होती. यंदा म्हणजे 2022 मध्ये 601 युनिट्‌सची विक्री झालेली आहे. गेल्या दोन्ही वर्षांमधील बाईक विक्रीचे अंतर 395 आहे. कंपनीने तब्बल 191.75 टक्क्यांची वाढ मिळवली आहे. याचे मार्केट शेअर्स 39.44 टक्के आहेत.

ट्राइंफ बाईक विक्रीत 88 टक्के वाढ

1000cc बाईक्सच्या विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर ट्राइंफ आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये 336 युनिट्‌ची विक्री झाली तर गेल्या वर्षी 178 युनिट्‌सची विक्री झाली होती. कंपनीने आपल्या विक्रीत तब्बल 88 टक्क्यांनी वाढ मिळवली आहे.

कावासाकीत घसरण

कावासाकीने गेल्या आर्थिक वर्षात 294 युनिट्‌ची विक्री केली होती. तर यंदाच्या वर्षी यात काहीशी घट झाली असून यंदा २८३ युनिट्‌ची विक्री करता आली आहे. कंपनीने 11 युनिट्‌सची कमी विक्री केलेली आहे.

सुझुकी आणि होंडा

1000cc बाईक्सच्या रेसमध्ये सुझुकी चौथ्या तर होंडा पाचव्या स्थानावर आहे. सुझुकीने यंदाच्या वर्षी २३३ युनिट्‌सची विक्री केली आहे. तर मागील वर्षी ही संख्या कमी होती. होंडाने गेल्या आर्थिक वर्षात 71 युनिट्‌सची विक्री केली होती तर यंदा त्यात वाढ झाली होऊन 92 युनिट्‌ची विक्री केली आहे.