Hero MotoCorp 2022 मध्ये इलेक्ट्रिक बाईक/स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या कंपनीचं प्लॅनिंग

| Updated on: May 16, 2021 | 7:36 PM

दुचाकी वाहनं बनविणारी देशातील आघाडीची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्प पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करणार आहे.

Hero MotoCorp 2022 मध्ये इलेक्ट्रिक बाईक/स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या कंपनीचं प्लॅनिंग
Hero Motocorp
Follow us on

मुंबई : भविष्यात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) रस्त्यांवर धावताना दिसतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. जगभरातील लोकांनी आपला मोर्चा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवला आहे. प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत.

पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिलेलं नाही. कार/मोटारसायकल कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, देशातील आघाडीची कंपनी हिरो मोटोकॉर्पसुद्धा (Hero Motocorp) इलेक्ट्रिक वाहनं लाँच करण्याच्या तयारीत आहे. (Hero motocorp is planning to launch electric vehicle in 2022, know more about it)

दुचाकी वाहनं बनविणारी देशातील आघाडीची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी हिरो मोटोकॉर्प (Hero Motocorp) पुढच्या वर्षी इलेक्ट्रिक मॉडेल्स सादर करण्याचा आणि या विभागात काम करण्याचा विचार करीत आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राबद्दल कंपनी उत्साहित आहे. यासाठी ते जयपूर (राजस्थान) आणि स्टीफनस्कीर्चेन (जर्मनी) मधील आर अँड डी केंद्रांचा वापर करणार आहेत.

याव्यतिरिक्त, त्यांनी तैवानच्या गोगोरो इंक सह करार केला आहे. ही भागीदारी तैवानच्या कंपनीची बॅटरी इंटरचेंज सिस्टम भारतात आणण्यासाठी केली आहे. या भागीदारीअंतर्गत या दोन्ही कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन विकासात सहकार्य करण्याचेही ठरविले आहे.

2021-22 मध्ये इलेक्ट्रिक वाहनं सादर करणार

हिरो मोटोकॉर्पचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) निरंजन गुप्ता यांनी विश्लेषकांशी बोलताना सांगितले की, 2021-22 मध्ये आम्ही इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. यामध्ये आपल्याला बर्‍याच पायऱ्या चढायच्या आहेत. आम्ही आमचे स्वतःचे उत्पादन बाजारात सादर करुन किंवा अदला-बदली वालं उत्पादन आणू किंवा गोगोरोसमवेत एकत्र येत उत्पादन सादर करु.

हिरोची अ‍ॅथर एनर्जीमध्ये गुंतवणूक

दुचाकी उत्पादन करणार्‍या कंपनीने या क्षेत्राचा उपयोग करण्यासाठी यापूर्वी बंगळुरूमध्ये ईव्ही (इलेक्ट्रिक वाहन) स्टार्टअप अ‍ॅथर एनर्जीमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीने यापूर्वीच बाजारात अनेक उत्पादने सादर केली आहेत.

हिरो स्वॅपिंग मॉडेलवर काम करणार

इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपनीने आखलेल्या रणनीतीबाबत सांगताना गुप्ता म्हणाले की, जर्मनी आणि जयपूरमधील कंपनीची आर अँड डी केंद्रे निश्चित चार्जिंग सिस्टमवर आधारित उत्पादने विकसित करण्याचे काम करत आहेत. तर दुसरीकडे गोगोरो भागीदारी अंतर्गत आम्ही स्वॅपिंग सिस्टमकडे लक्ष देत आहोत.

गुप्ता म्हणाले, “आम्हाला वाटते की, दोन्ही कंपन्या एकत्र काम करतील. मागणी आणि उपलब्ध पायाभूत सुविधा मिळाल्यास आमचा स्वतःचा प्रोग्राम स्टॅटिक चार्जिंगवर आधारित असेल आणि गोगोराबरोबर आम्ही स्वॅपिंग मॉडेलवर काम करू. याद्वारे आम्ही दोन्ही क्षेत्रात काम करू शकू.

संबंधित बातम्या

Citroen ची छोटी इलेक्ट्रिक कार लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Kia च्या इलेक्ट्रिक कारचा जलवा, लाँचिंगपूर्वीच 7000 गाड्यांची विक्री

सिंगल चार्जवर तब्बल 800 किमी धावणार, 3 सेकंदात 100 किमी वेग, MG ची इलेक्ट्रिक कार बाजारात

(Hero motocorp is planning to launch electric vehicle in 2022, know more about it)