Tesla ने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं, अन्यथा… नितीन गडकरींचा सल्लावजा इशारा

नितीन गडकरी यांनी अशी सूचना केली आहे की, टेस्लाने लवकरच भारतात काम सुरू केले पाहिजे, अन्यथा भारतात कार्यरत इतर ईव्ही उत्पादक कंपन्या लवकरच टेस्लाच्या स्टँडर्डच्या गाड्यांची निर्मिती सुरु करतील.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 17:22 PM, 17 Apr 2021
Tesla ने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं, अन्यथा... नितीन गडकरींचा सल्लावजा इशारा
Nitin Gadkari

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकन इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला (Tesla) कडे विनंती केली आहे की, कंपनीने लवकरात लवकर भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन सुरू करावे. सरकार ईव्ही उत्पादक कंपनीला देशात औद्योगिक क्लस्टर तयार करण्यास मदत करेल, अशी ग्वाही गडकरी यांनी टेस्लाला दिली आहे. नितीन गडकरी रायसीना डायलॉग 2021 (Raisina Dialogue 2021) मध्ये बोलत होते, तेथे त्यांनी इलेक्ट्रिक मोबिलिटी, ईव्ही बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग, व्हेईकल स्क्रॅप पॉलिसीसारख्या अनेक विषयांवर भाष्य केले, तसेच विविध प्रश्नांची उत्तरं दिली. (Nitin Gadkari asks Tesla to start production in India as soon as possible)

नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमादरम्यान सांगितले की, “टेस्ला मॅनेजमेंटबरोबर माझी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठक झाली. या बैठकीवेळी मी त्यांना सुचवलं की त्यांच्यासाठी भारतात उत्पादन सुरू करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे कारण, सध्या ऑटो एलिमेंट्सचा प्रश्न आहे, टेस्ला आधीपासूनच भारतीय उत्पादकांकडून विविध एलिमेंट्स (घटक) घेत आहे. तसेच यावेळी गडकरी यांनी टेस्लाच्या अधिकाऱ्यांना आश्वासन दिले की, कंपनी स्वतः भारतात त्यांचे वेंडर्स (विक्रेते) तयार करु शकते, तसेच कंपनी येथे तयार केलेल्या वाहनांची अन्य देशांमध्ये निर्यात करु शकते.

नितीन गडकरी यांनी अशी सूचना केली आहे की, टेस्लाने लवकरच भारतात काम सुरू केले पाहिजे, अन्यथा भारतात कार्यरत इतर ईव्ही उत्पादक कंपन्या लवकरच टेस्लाच्या स्टँडर्डच्या गाड्यांची निर्मिती सुरु करतील. गडकरी म्हणाले की, दिवसेंदिवस भारतीय उत्पादनातही सुधारणा होत आहे आणि दोन वर्षांत आम्हाला टेस्ला स्टँडर्ड इलेक्ट्रिक वाहने भारतीय बाजारात मिळतील. म्हणूनच, टेस्लाच्या हितासाठी मी सुचवतो की, त्यांनी शक्य तितक्या लवकर वाहनांचे उत्पादन सुरू करावे. ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल.

टेस्लाने अद्याप या गोष्टीची पुष्टी केलेली नाही की, भारतात त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन कधीपासून सुरु होईल. जगातील सर्वात महाग ईव्ही उत्पादक कंपनीने सध्या मुंबई, दिल्ली आणि बंगळुरुसारख्या भारतातील प्रमुख शहरांमध्ये आपल्या इलेक्ट्रिक कार्स विकण्याची योजना तयार केली आहे.

कर्नाटकमध्ये उत्पादन सुरु करणार

टेस्लाने आपली भारतीय शाखा टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या वर्षी जानेवारीत आरओसी बेंगळुरू येथे रजिस्टर केली आहे. अलीकडेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी असा दावा केला होता की, टेस्ला कर्नाटकात पहिली भारतीय सुविधा सुरु करणार आहे. टेस्लाने भारतात उत्पादन सुरू केल्यानंतर चीनबाहेरील आशियातील ही त्यांची दुसरी सुविधा असेल आणि ते देशातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीतलं मोठं पाऊल असेल.

माध्यमांच्या वृत्तानुसार, टेस्ला या वर्षाच्या अखेरीस भारतात सर्वात स्वस्त मॉडेल 3 सेडान सादर करुन आपला व्यवसाय भारतात सुरू करणार आहे. टेस्ला मॉडेल 3 संपूर्ण बिल्ट युनिट (सीबीयू) माध्यमातून आयात केली जाईल आणि नंतर 55 लाख रुपये या सुरुवातीच्या किंमतीत ही कार भारतीय बाजारात उपलब्ध केली जाईल.

संबंधित बातम्या

टेस्ला मोटर्सचा भारतात मोठा प्लॅन, ‘या’ राज्यात सुरू करणार उत्पादन केंद्र

‘ही’ असेल Tesla ची भारतातील पहिली कार, कंपनी गुजरातमध्ये कामकाज सुरु करणार?

‘या’ कारणामुळे टेस्लाच्या गाड्यांवर चिनी लष्कराकडून बंदी

(Nitin Gadkari asks Tesla to start production in India as soon as possible)