‘लाथा-बुक्के मेळावा’ भाजपच्या अंगलट येईल?

शरद जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय.. पहिल्या टप्प्यातील मतदानही होतंय.. पण जळगाव लोकसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडींनी संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रीत केलं आहे.. बुधवारच्या अमळनेरमधील ‘भाजप लाथा-बुक्के’ मेळाव्यानं तर त्यावर कळस चढवला.. त्यामुळंच एक पत्रकार म्हणून आणि या मतदारसंघातील मतदार म्हणूनही या सर्व परिस्थितीवर व्यक्त होणं आणि जळगाव मतदारसंघातील […]

'लाथा-बुक्के मेळावा' भाजपच्या अंगलट येईल?
Follow us
| Updated on: Apr 11, 2019 | 3:02 PM

शरद जाधव, टीव्ही 9 मराठी, मुंबई

देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय.. पहिल्या टप्प्यातील मतदानही होतंय.. पण जळगाव लोकसभा मतदारसंघात घडलेल्या राजकीय घडामोडींनी संपूर्ण राज्याचं लक्ष केंद्रीत केलं आहे.. बुधवारच्या अमळनेरमधील ‘भाजप लाथा-बुक्के’ मेळाव्यानं तर त्यावर कळस चढवला.. त्यामुळंच एक पत्रकार म्हणून आणि या मतदारसंघातील मतदार म्हणूनही या सर्व परिस्थितीवर व्यक्त होणं आणि जळगाव मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल लिहणं गरजेचं वाटतं आहे..

निवडणूक जाहीर होऊन आज 31 दिवस उलटले आहे.. या एका महिन्यात जळगाव मतदारसंघातील माझ्यासारख्या मतदारांनी अनेक राजकीय उलथापालथ पाहिल्या.. प्रामुख्यानं भाजपच्या गटात अत्यंत धक्कादायक आणि वेगवान घडामोडी घडल्या.. निवडणूक जाहीर होण्याआधी विद्यमान खासदाराचे अश्लिल फोटो व्हायरल होणं असो किंवा मग प्रचार सुरू झालेला उमेदवार बदलून नवा उमेदवार देण्याचं राजकारण.. अशा साऱ्या पतिस्थितींमुळे जळगाव मतदारसंघातली चुरस वाढली आहे.. प्रमुख लढत ही राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि भाजपचे आ.उन्मेष पाटील यांच्यात असली, तरी जळगावच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष राहणार हे मात्र निश्चित..

भाजपच ताकदवान, पण तरीही..

जळगाल लोकसभा मतदारसंघातली सहा विधानसभा मतदारसंघांवर नजर टाकता, जळगाव शहर- सुरेश भोळे (भाजप), जळगाव ग्रामीण- गुलाबराव पाटील (शिवसेना), अमळनेर- शिरीष चौधरी (अपक्ष आणि भाजप समर्थक), एरंडोल- सतिश पाटील (राष्ट्रवादी), चाळीसगाव- उन्मेश पाटील (भाजप), पाचोरा- किशोर पाटील (शिवसेना) असे चित्र समोर येतं.. पक्षनिहाय आमदारांचा विचार करता, मतदारसंघात भाजप-शिवसेनेची ताकद जास्त आहे..  पण असं असतानाही भाजपला राज्यात कुठेच नाही, पण जळगावात मात्र पराभवाच्या भीतीनं उमेदवार बदलावा लागला हेही सत्य आहे.. या बदलात चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटलांना संधी मिळाली.. पण पक्षातील गटबाजीला आलेले उधाण पाहता याला संधी म्हणावी की राजकीय घात हा खरा प्रश्न आहे..

खासदार ए.टी.पाटलांची नाराजी भोवणार?

भाजपची चिंता वाढण्याचं प्रमुख कारण म्हणजे, विद्यमान खासदारांची नाराजी. गेली दोन टर्म खासदार असलेल्या ए.टी.पाटील यांचे तिकीट ज्या तऱ्हेने कापण्यात आलं, त्यामुळं भाजपमधील एक मोठा गट नाराज झाला आहे..त्यात केवळ ए.टी.पाटलांचे समर्थकच आहेत असे नाही. तर एकनाथ खडसेंना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचाही नाराजांमध्ये समावेश आहे.. स्वतः ए.टी.पाटील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमधून त्याविषयी उघड बोलले, बोलतायेत..त्यामुळं हे नाराज कार्यकर्ते दुसऱ्यांदा बदलेले उमदेवार उन्मेष पाटलांना कितपत मदत करणार हा प्रश्नच आहे..

वाघांचे कापलेले ‘तिकीट’ पाटलांना संसदेत पोहोचवणार?

भाजपच्या गोटात चिंतेचं दुसरं कारण आहे, स्मिता वाघ आणि उदय वाघ यांचा अपमान.. ए.टी.पाटलांचे फोटो व्हायरल झाल्यापासूनच त्यांना यावेळी तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट झालं होतं.. त्यामुळे आधीपासून इच्छुकांचा प्रचार सुरू झाला होता. ज्यात उदय वाघ हेही आघाडीवर होतेच..उमेदवार यादीत अपेक्षेप्रमाणे त्यांच्या पत्नी स्मिता वाघ यांचे नाव आलं आणि त्यांच्या प्रचाराचा जोर अधिक वाढला.. पण, जोरदार प्रचार सुरू असतांनाच भाजपनं स्मिता वाघ यांचं जाहीर झालेली उमेदवारी रद्द केली आणि वाघ गटातील उत्साह निरुत्साह बदलला.. उन्मेष पाटलांचे नाव येताच स्मिता वाघ यांनी सुरुवातीलाच त्यांची नाराजीही बोलून दाखवली होती.. त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जायचा तो संदेश आधीच गेला आहे.. आता पतीच जिल्हाध्यक्ष असल्यानं वाघ दाम्पत्य उन्मेष पाटलांच्या प्रचारात दिसतात खरे.. पण, प्रचारात ते नेमकं काय करतायेत? हे अमळनेरच्या घटनेतून दिसून आहे.. त्यामुळं, शरिरानं उन्मेष पाटलांसोबत दिसणारे वाघ मनाने त्यांच्यासोबत आहेत की नाही, याबाबत जरा शंकाच आहे.

स्वपक्षीय विरोधकांकडून धोका

तिसरे कारण आहे, संपूर्ण जळगाव जिल्हा चाळीसगाव तालुका भाजपातील दुफळी.. उन्मेष पाटील आमदार झाल्यापासूनच भाजपमध्ये दोन गट पडले.. उन्मेष पाटील हे गिरीश महाजनांचे अत्यंत निकटवर्तीय बनल्यानं अनेक जण त्यांच्यावर नाराज होते. खडसेंच्या राजीनाम्यानंतरही तर जिल्ह्यातील भाजपमधील फूट आणि गटबाजी अधिक स्पष्ट झाली.. तालुक्यात उन्मेष पाटील समर्थक एकीकडे आणि भाजपचे इतर नेते एकीकडे अशी निर्माण झाली.. पण असं असतानाही पंचायत समिती असो किंवा नगरपालिका… प्रत्येक निवडणुकीत उन्मेष पाटील राष्ट्रवादीसह स्वपक्षीय विरोधकांनाही पुरून उरले. पण आता लढाई मोठी आहे.. नाराजांच्याच शब्दात सांगायचे तर, गिरीश महाजन आणि त्यांचे निकटवर्तीय आ.उन्मेष पाटलांची एकाधिकारशाही मोडीत काढण्याची लोकसभा निवडणूक ही सुवर्णसंधी म्हणून आलीय… त्यामुळे सहा मतदारसंघात फिरताना स्थानिक विरोधी गट हे उन्मेष पाटलांची डोकेदुखी वाढवणार हे स्पष्ट दिसतं आहे..

देवकरांना हरवण्याचे आव्हान सोप्पं नाही !

भाजपच्या अडचणीचं चौथे कारण म्हणजे तगडा प्रतिस्पर्धी.. गुलाबराब देवकर यांच्या रुपाने राष्ट्रवादीने जळगावमध्ये तगडा उमेदवार दिला आहे.. सुरुवातीला भाजपकडून स्मिता वाघ यांचे नाव जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच जळगावात जिंकणार अशी चर्चा सुरू झाली होती.. काही उतावीळ कार्यकर्त्यांनी तर गुलाबराव देवकर जसे निवडूनच आले या आविर्भावात शुभेच्छाही द्यायला सुरुवात केली होती.. आणि विरोधकांच्या या खेळीने भाजपला उमेदवार बदलण्यास भाग पाडले.. पण, जिल्हापरिषद अध्यक्षपद, विधानपरिषद आमदार असे अनेक पदं सांभाळलेल्या स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून पहिल्यांदा आमदार झालेल्या उन्मेष पाटलांना उमेदवारी देण्यात काय शहाणपण?  असाही प्रश्न भाजपच्या अंतर्गत उपस्थित केला जातोय.. त्यामुळं आता उन्मेष पाटील हे माजी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेल्या गुलाबराव देवकरांना पराभूत करत जळगावची जागा वाचवण्यात यशस्वी होतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे..

अनुभव, जनसंपर्क देवकरांच्या कामी येणार?

जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने दोन विधानसभा मतदारसंघातील मतदान हे निर्णायक ठरणार आहे.. ते मतदारसंघ म्हणजे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण.. त्यातही जळगाव शहरातून लीड मिळणारा उमेदवारच खासदार होतो असं आजवरचं चित्रं.. गुलाबराव देवकर हे जळगावचे स्थानिक आहे.. नगरसेवकपदापासून ते मंत्रिपदापर्यंत त्यांची वाटचाल राहिलीय.. आमदार, पालकमंत्री म्हणून त्याचं काम आहे.. व्यक्तिगत त्यांचे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध आहेत.. कार्यकर्त्यांचे चांगलं नेटवर्क आहे. त्यामुळे या सर्वाचा देवकरांना काहीसा फायदा होण्याचीही शक्यता आहे..जनसंपर्काचा विचार करता उन्मेष पाटलांपेक्षा देवकरांचा जनसंपर्क हा निश्चितच जास्त आहे..  याचा अर्थ अनुभव, जनसंपर्क याच्या बाबतीत देवकर उजवे ठरतात..

अमळनेरचे ‘लाथा-बुक्के’ महागात पडणार ?

पक्षनिहाय विधानसभा मतदारसंघ, जळगाव महापालिकेतील सत्ता पाहता.. भाजपचं पारडं जड आहे.. त्यात स्वतः गिरीश महाजनांनी उमेदवार बदलीचा डाव खेळल्यानं त्यांना यात वैयक्तीक लक्ष घालावं लागतं  आहे.. पण, असं असलं तरी पक्षात गटबाजी मात्र प्रचंड उफाळली असल्याचं अमळनेरच्या घटनेनं जगजाहीर केलंय.. जिल्हाध्यक्ष असलेल्या वाघ यांनी कशाचाही विचार न करता भर मेळाव्यात खडसे समर्थक माजी आमदार बी.एस.पाटलांना लाथा-बुक्क्यांनी चोप दिला… हे कमी म्हणून की काय स्वत: गिरीश महाजनांना देखील धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं.. तिकीट कापाकापीनंतर पक्षातील शिस्तच संपल्याचं या प्रकारानं पुराव्यानिशी उघड झालं आहे.. नेत्यांच्या गटबाजीमुळे कार्यकर्त्यांची भक्कम फळीही मोडून पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं भाजपच्या बालेकिल्ल्याचा पाया गटबाजीनं पोखरल्याचं उघड झालंय.. अमळनेरमध्ये अपक्ष आमदार शिरीष चौधरी, पाचोऱ्याचे शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत आर.ओ. पाटील हे देखील लोकसभेसाठी इच्छुक होते.. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून तसे प्रयत्नही झाले.. त्यामुळे नाराज शिवसेना आणि नाराज अपक्ष आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते हे देखील ऐन निवडणुकीत भाजपला इंगा दाखवू शकतात..अमळनेरमधून या नाराजी नाट्याची सुरुवातही झालीय.. हे चित्र असंच राहिलं, तर 5 आमदारांच्या माध्यमातून दिसणारी भाजपची ताकदही बिनकामाची ठरण्याची भीती आहे..

.. तर तेलही गेलं आणि तूपही गेलं होईल

ही निवडणूक आ. उन्मेष पाटलांसाठी सट्टा ठरणार आहे..  कारण विजय मिळाला तर ते अगदी कमी वेळात मोठी भरारी घेणारे नेते ठरतील. राजकीय कारकीर्द उजळेल. पण त्याच वेळी जर पराभव झाला तर, लोकसभेपाठोपाठ विधानसभाही अवघड होऊन बसेल. पण, त्याचा हा पराभव फक्त त्यांनाच नाही, तर त्यांनी पुढे करणाऱ्या गिरीश महाजनांच्या जिल्ह्यातील नेतृत्वाचा पराभव असेल. अशावेळी पुन्हा एकदा जिल्ह्यात खडसेंच्या नेतृत्वाचं पुनरागमन  होईल..आणि खडसेंकडे जिल्ह्याची सूत्र गेली तर उन्मेष पाटलांच्या विरोधी गटाचं पारडं जड होईल. असं घडलंच तर मात्र तेलही गेलं आणि तूपही गेलं असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येऊ शकते.. थोडक्यात उन्मेष पाटलांची राजकीय स्थिती मनिष जैन यांच्यासारखी होण्याची भीती आहे.

गिरीश महाजनांची प्रतिष्ठा पणाला

खरं तर जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल हे भाजपच्या बाजूनं आहे.. पण गरज  नसताना भाजपनं उमेदवार बदलाचा खेळ करत सोपी निवडणूक अवघड करून घेतली आहे.. भाजपातील गटबाजी उघड झाल्यानं, आता जळगावची लढत चुरशीची बनली आहे.. गुलाबराव देवकरांसारखा मुरब्बी उमेदवार आणि त्यांच्यासमोर असलेले गिरीश महाजनांचे निकटवर्तीय आमदार उन्मेष पाटील अशी ही तुल्यबळ लढत बनली आहे…या लढतीचा निकाल केवळ लोकसभाच नाही तर त्यामाध्यमातून आगामी विधानसभा आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा ठरवणार आहे.. जळगाव लोकसभा निवडणूक ही केवळ उन्मेष पाटलांसाठीच नव्हे तर गिरीश महाजनांसाठी देखील ॲसिड टेस्ट आहे..

(सूचना – सदर ब्लॉगमधील मतं ही लेखकाची वैयक्तिक आहेत.)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.