मोठी आनंदवार्ता! RBI चे नवीन वर्षांचे गिफ्ट, कार, होम लोनचा EMI कमी झाला, खिशात पैसा खुळखुळणार

RBI Repo Rate: मोठी आनंदवार्ता आली आहे. वर्षाच्या अखेरीस अनेकांचे घराचे, चारचाकीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. रेपो दरात कपात करण्याची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठे बळ मिळाले आहे.

मोठी आनंदवार्ता! RBI चे नवीन वर्षांचे गिफ्ट, कार, होम लोनचा EMI कमी झाला, खिशात पैसा खुळखुळणार
मोठी आनंदवार्ता, EMI कमी झाला
Image Credit source: आरबीआय
Updated on: Dec 05, 2025 | 10:40 AM

RBI Repo Rate EMI Reduced: स्वतःचे घर, चारचाकी घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोठी आंनदवार्ता येऊन धडकली आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर कमी करण्याच्या बाजूने सदस्यांनी मतदान केले आहे. 0.25 टक्क्यांनी रेपो दरात कपात झाली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जावरील व्याजदरातही मोठी कपात होणार आहे. आता बँकांसह औद्योगिक आणि रिअल इस्टेट क्षेत्राला बहर येणार आहे. कारण अनेक जण ईएमआय कमी असल्याने घर आणि वाहन खरेदी करतील. आरबीआयने जणू नागरिकांना नवीन वर्षांचे गिफ्ट दिले आहे.

आता रेपो दर 5.25 टक्के

आरबीआयच्या पतधोरण समितीने (MPC) रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आरबीआयचा रेपो दर घसरून 5.25 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी केंद्रीय रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी, एप्रिल आणि जून महिन्यात कपात केली होती. याचा अर्थ या कॅलेंडर वर्षात आरबीआयने 6 मधील 4 बैठकीत व्याजदर कपातीच्या बाजूने कौल दिला आहे. आतापर्यंत 1.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कुठलाही बदल केला नव्हता. आता रेपो दरात कपातीचा निर्णय घेतल्याने येत्या काळातही रेपो दरात अधिक घसरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी आरबीआय गव्हर्नरने व्याजदरात कपातीचे संकेत दिले होते. काही दिवसांपूर्वी आरबीआय गव्हर्नर यांनी महागाई वाढल्याचे कारण देत व्याजदर कपात टाळली होती. दिवाळीत ग्राहकांना ईएमआय कपातीचा आनंद मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. मात्र वर्षाअखेर आरबीआयने व्याजदरात कपातीचे गिफ्ट सर्वसामान्यांना दिले आहे. अनेकांना आता घर आणि वाहन खरेदी करता येईल.

GDP वृद्धी होण्याची शक्यता

आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आर्थिक वर्ष 2026 साठी GDP वृद्धी दर अंदाज वाढवून तो 7.3 टक्के केला आहे. हा अंदाज यापूर्वी 6.8 टक्के इतका होता. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे संकेतच केंद्रीय बँकेने दिले आहेत. विकास दर सातत्याने वाढत असल्याचे आणि अर्थव्यवस्था वेगाने धावत असल्याचे संकेत आरबीआयने दिले आहे.