खेळण्यातही ‘बुलडोजर’चा बोलबाला! देशभरातील खेळणी बाजारात बुलडोजरची प्रचंड मागणी

| Updated on: May 02, 2022 | 8:56 AM

राजकारण, समाजकारण आणि चित्रपटांचा मोठा परिणाम भारतीय समाजावर होतो. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत बुलडोजरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याचा परिणाम बालकांवरही दिसून आला. खेळण्यांमध्ये बुलडोजरच्या मागणीत अचानक वाढ दिसून आली आहे.

खेळण्यातही बुलडोजरचा बोलबाला! देशभरातील खेळणी बाजारात बुलडोजरची प्रचंड मागणी
Follow us on

उत्तर प्रदेशातील निवडणुकीत (UP Election) बुलडोजरचा (Bulldozer) बोलबाला होता. सभेच्या स्थळी उभे असलेले बुलडोजर पाहुन आनंद व्यक्त करणारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता. त्याचा मोठा परिणाम समाजमनावर झाला. एवढेच नव्हे तर बालमनावरही त्याचा परिणाम दिसून आला. देशभरातील खेळण्याच्या बाजारात अचानक बुलडोजरची प्रचंड मागणी वाढली. राजकारणामुळे उपलब्ध झालेली ही संधी हातची सोडायची नाही अशा निर्धाराने अचानक वाढलेली ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशभरातील खेळणी निर्माता आणि उत्पादकांनी कंबर कसली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने त्यांच्या प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या अचानक मागणी मागील कारणमीमांसा स्पष्ट केली. टीव्हीवर सातत्याने बुलडोजरच्या बातम्यांमुळे त्याचा परिणाम बाल मनावर झाला आणि देशभरात बुलडोजर लोकप्रिय झाले. खेळण्यातही बुलडोजरचा बोलबाला झाला. या सर्व घडामोडीचे श्रेय कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिले आहे. यापूर्वी लहान मुलांमध्ये जीप, कार, ट्रॅक्टर, पोलिस व्हॅन, अँम्ब्युलन्स, ट्रक यांची मागणी जास्त होती.

एका महिन्यातच बुलडोजरची मागणीत वाढ

गेल्या महिन्याभरातच खेळणे बाजारात बुलडोजरची मागणी वाढली आहे. सध्याच्या स्थितीत 100 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंतच्या बुलडोजर खेळण्यांचे उत्पादन करण्यात येत आहे. या खेळण्यांमध्ये हाताने ढकलण्यात येणारे बुलडोजर, रिमोटद्वारे चालणारे बुलडोजर यांची संख्या अधिक आहे. छोट्या, मध्यम आणि मोठ्या आकारातील बुलडोजरचा यामध्ये समावेश आहे. येत्या काही दिवसांत बुलडोजरची मागणी अजून वाढण्याची शक्यता आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश निवडणुकीतील बुलडोजर प्रचारातील मुख्य मुद्दा होता. तर आता त्याचा परिणाम मध्य प्रदेश, गुजरात सह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या राज्यातील लहान मुलांमध्येही बुलडोजर विषयी आकर्षण वाढले आहे. एवढेच नाही तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन हे 21 एप्रिल रोजी गुजरातच्या दौ-यावर असताना त्यांनी बुलडोजरमधून प्रवास केला. बुलडोजर किती लोकप्रिय आहे हे या एका बोलक्या उदाहरणावरुन स्पष्ट होते.