
पेन्शन दुप्पट होणार अथवा त्यात काही तरी वाढ होणार अशा आशेवर सेवानिवृत्तीधारक होते. भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची (EPFO-CBT) बैठक नुकतीच झाली. त्यात अनेक मोठे बदल करण्यात आले. त्याची वृत्तही समोर आली आहे. आता पूर्ण रक्कम काढण्याची सुविधा आली. तर EPFO 3.0 लाही मंजुरी देण्यात आली. पण खरी प्रतिक्षा होती ती पेन्शन वाढीसंदर्भात. त्याविषयी कुठलीच अधिकृत घोषणा न झाल्याने देशभरातील पेन्शनर्स चिंतेत आहेत. याविषयीची कुठलीच अपडेट समोर येत नसल्याने संभ्रम वाढला आहे. याविषयीची अपडेट तरी काय आहे?
EPFO मधील पूर्ण रक्कम काढता येणार
ईपीएफओच्या 238 व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) बैठकीत मोठे निर्णय झाले. केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांच्या अध्यक्षतेखाली ईपीएफओच्या बोर्डाच्या बैठकीत कोट्यवधी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला. कर्मचाऱ्यांना
त्यांच्या खात्यातील 100% शिल्लक रक्कम म्हणजे कर्मचारी आणि नियोक्ताचे योगदान काढू शकतील. तर आंशिक रक्कम काढण्याचा नियम पण सोपा आणि पारदर्शक करण्यात आला आहे. या नवीन नियमांमुळे पैसे काढताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. आजारी, शिक्षण,घर बांधकामासाठी आणि लग्नासाठी रक्कम काढता येईल.
पण सदस्यांच्या खात्यात नेहमी 25 टक्के रक्कम शिल्लक असणे गरजेचे आहे. यामध्ये सदस्यांना 8.25 टक्के व्याज दर आणि चक्रवाढ व्याज म्हणजे कम्पाऊंड व्याज मिळण्याचा फायदा मिळेल. त्यामुळे सेवानिवृत्तीसाठी मोठा फंड तयार होईल. ईपीएफओ 3.0 च्या आधुनिकीकरणाला मंजूरी देणे असे बदल करण्यात आले आहे. आतापर्यंत रक्कम काढण्यासाठी वेगवेगळ्या स्थितीसाठी 13 प्रकारचे नियम होते. ते तीन सोप्या श्रेणीत विभाजीत करण्यात आले आहे.
पेन्शन वाढीबाबत काय निर्णय?
यावेळी सेवानिवृत्तीधारकांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ होईल अशी देशभरात जोरदार चर्चा होती. EPS-95 योजनेतंर्गत पेन्शनचे नुतनीकरण करण्यात येईल असा दावा करण्यात येत होता. 238 व्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मात्र याविषयीचा प्रस्तावच समोर आला नसल्याची माहिती आता समोर येत आहे. याविषयी चर्चा न झाल्याने पेन्शन वाढीचा निर्णय थंडबस्त्यात पडल्याचे समोर येत आहे. आता पुढील बैठकीत तरी त्यावर निर्णय होईल की नाही असा सवाल करण्यात येत आहे.