Cheque : धनादेश वटवण्यासाठी 2 दिवसांची वाट कशाला पाहता? RBI चा नवीन नियम काय?
RBI Cheque : सध्या धनादेश वटवण्यासाठी किमान दोन दिवसांची वाट पाहावी लागते. दोन दिवसानंतर चेकची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा होते. पण आता ही प्रतिक्षा संपणार आहे. काय घेतला आरबीआयने तो नवीन नियम?

भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) देशातील बँकिंग सिस्टिममध्ये बड्या बदलाची घोषणा केली आहे. आता धनादेश वटवण्यासाठी दोन दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार नाही. उलट अवघ्या काही तासात धनादेशाची रक्कम खात्यात जमा होईल. या नवीन व्यवस्थेत चेक क्लियरिंगची गती वाढवण्याची आणि जोखीम कमी करण्याची आणि ग्राहकांना गतीशील सेवा देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. आरबीआय आता या प्रकरणी settlement on realization च्या दिशेने पुढे जात आहे.
कधी लागू होईल ही नवीन व्यवस्था?
धनादेश वटवण्याची ही नवीन व्यवस्था अधिक जलद करण्यात येत आहे. ही व्यवस्था 4 ऑक्टोबर 2025 रोजीपासून सुरू होत आहे. या नवीन व्यवस्थेतंर्गत ग्राहकांकडून प्राप्त धनादेश लागलीच स्कॅन करून क्लिअरिंगसाठी पाठवण्यात येईल. ही प्रक्रिया सकाळी 10 वाजेपासून 4 वाजेपर्यंत एका सिंगल क्लिअरिंग सत्रात पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे यापुढे ग्राहकांना आता धनादेश वटण्यासाठी वाट पाहावी लागणार नाही.
दोन टप्प्यात लागू होईल नवीन व्यवस्था
ही नवीन प्रणाली दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 4 ऑक्टोबर 2025 ते 2 जानेवारी 2026 रोजीपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 3 जानेवारी 2026 पासून कायमस्वरुपी पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात आता धनादेश मिळाल्याची पुष्टी त्या बँकेला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत द्यावी लागेल. बँकेने चेक स्वीकारला की नाही स्वीकारला हे त्यामुळे स्पष्ट होईल. जर बँकेने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही तर बँकेने तो स्वीकारल्याचे समजण्यात येईल. बँकेला पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
दुसऱ्या टप्प्यात 3 तासांची मर्यादा
तर जानेवारी 2026 पासून दुसरा टप्पा लागू होईल. त्यात धनादेश प्राप्त करणाऱ्या बँकेला अवघ्या 3 तासात धनादेश प्राप्त झाल्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर लागलीच पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. एखादा धनादेश मिळाल्याचे सांगितल्यावर बँकेला ग्राहकांच्या खात्यात धनादेशाची रक्कम हस्तांतरीत करावी लागेल. दोन टप्प्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात 4 ऑक्टोबर 2025 ते 2 जानेवारी 2026 रोजीपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात 3 जानेवारी 2026 पासून कायमस्वरुपी पूर्ण करण्यात येईल.
