Gold News : भारताला सर्वात जास्त सोनं कुठला देश विकतो? या देशाकडे एवढं सोनं येतं कुठून?
Gold News : स्वतःच्या सोन्याच्या खाणी नसतानाही असा एक देश आहे जो सोन्याचे शुद्धीकरण आणि निर्यात करण्यात जगात आघाडीवर आहे. इतर देशांकडून कच्चं सोनं आयात करून तसेच जुन्या सोन्याचा पुनर्वापर करून तो भारतासह जगभरातील बाजारपेठांमध्ये सोन्याचा पुरवठा करतो. हा कोणता देश आहे जाणून घ्या

भारतामध्ये सोन्याला केवळ दागिन्यांपुरते महत्त्व नाही, तर गुंतवणूक आणि सांस्कृतिक परंपरेतही त्याचे विशेष स्थान आहे. लग्न, सण आणि गुंतवणुक यामुळे भारतात सोन्याची मोठी मागणी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला परदेशातून मोठ्या प्रमाणावर सोनं आयात करावं लागतं. पण तुम्हाला माहित आहे का भारतात सर्वाधिक सोनं कोणत्या देशातून येतं? या देशाकडे स्वतःच्या सोन्याच्या खाणी नसल्या तरी सोनं हा भारताला सर्वाधिक सोनं पुरवणारा देश कसा ठरतो, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
भारतात जेव्हा सोन्याची चमक आणि त्याच्या विक्रमी खरेदीची चर्चा होते, तेव्हा सर्वप्रथम स्वित्झर्लंडचे नाव समोर येते. सुंदर निसर्ग सौंदर्य, बँका आणि आलिशान घड्याळांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या या युरोपीय देशात स्वतःची एकही सोन्याची खाण नाही. तरीही जागतिक स्तरावर सोने निर्यात करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये स्वित्झर्लंडचा समावेश होतो. भारतही आपल्या सोन्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या देशातून मोठ्या प्रमाणावर सोने आयात करतो.
स्वतःच्या खाणी नसतानाही सोनं येतं कुठून?
स्वित्झर्लंडकडे सोन्याच्या मोठ्या खाणी नसल्या, तरी ते जागतिक स्तरावरील सोने शुद्धीकरण आणि निर्यातीचे महत्त्वाचे केंद्र आहे. यामागे तेथील अत्याधुनिक रिफायनरी आणि सोने शुद्ध करण्याचे तंत्रज्ञान आहे. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पेरू आणि इतर देशांमधून कच्चे सोने स्वित्झर्लंडमध्ये आणले जाते. त्यानंतर त्यातील अशुद्धता आणि इतर धातू वेगळे करून सोन्याची शुद्धता वाढवली जाते.
याशिवाय सोन्याच्या जागतिक व्यापारात पुनर्वापरालाही महत्त्व आहे. जगभरातील जुने दागिने, तुटलेले सोन्याचे दागिने आणि वापरात नसलेल्या सोन्याच्या वस्तू वितळवून त्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी स्वित्झर्लंडमध्ये पाठवले जाते. तेथे या सोन्यावर प्रक्रिया करून त्याची शुद्धता वाढवली जाते. त्यानंतर हे सोने नव्या स्वरूपात पुन्हा जागतिक बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जाते.
भारतासाठी स्वित्झर्लंड का महत्त्वाचे?
भारतामध्ये सोन्याची मागणी मोठी असल्याने देशाला आयातीवर अवलंबून राहावे लागते. स्वित्झर्लंडमधील रिफायनरी, आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्था आणि वाहतूक सुविधांमुळे तेथून भारतात सोने आयात केले जाते. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली, तर भारताच्या एकूण सोन्याच्या आयातीपैकी सुमारे ३५ ते ४५ टक्के सोने स्वित्झर्लंडमधून आयात केले जात असल्याचे दिसून येते.
स्वित्झर्लंड किती सोने निर्यात करतो?
जागतिक व्यापार अहवालांनुसार, स्वित्झर्लंड दरवर्षी अंदाजे १,००० ते १,५०० टन सोने निर्यात करतो. मात्र, जागतिक मागणी, सोन्याचे दर, कर धोरणे आणि चलनातील चढ-उतार यांनुसार निर्यातीचे प्रमाण दरवर्षी बदलत असते.