
गेल्या तीन दिवसात सोन्याने दरवाढीचा धडाका लावला. एका दिवसात सोने 5 हजारांनी महागले. सराफा बाजारातही मोठी घोडदौड दिसून आली. गेल्या तीन दिवसात सोन्याने महागाईचा बिगूल वाजवला. तर चांदीने दमदार कामगिरी बजावली. दोन्ही धातुच्या मोठ्या धमक्याचा परिणाम गुंतवणुकीवर दिसून आला. गोल्ड ईटीएफमध्ये भूतो न भविष्यती अशी वाढ दिसली. त्यामुळे सोने-चांदी खरेदीदारापेक्षा गुंतवणूकदार अधिक मालामाल झाल्याचे दिसून आले. काय आहेत या दोन्ही धातुच्या किंमती?
सोन्याची मोठी भरारी
गुडरिटर्न्सने अपडेट केलेल्या किंमतीनुसार, 8 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट एक ग्रॅम सोन्याचा भाव 460 रुपयांनी तर 9 सप्टेंबर रोजी 136 रुपयांनी, 10 सप्टेंबर रोजी 220 रुपयांनी तर आज सकाळच्या सत्रातही सोन्याच्या किंमतीत वाढ दिसली. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,10,670 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,01,460 रुपये इतका आहे.
चांदी चमकली
गेल्या आठवड्यातील पडझडीनंतर चांदीने मोठी झेप घेतली. 8 सप्टेंबर रोजी चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली होती. तर 9 सप्टेंबर रोजी चांदीने 3 हजारांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, सकाळच्या सत्रात चांदीने झेप घेतली आहे. एक किलो चांदीचा भाव 1,29,000 रुपयांवर आला आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदीचा भाव वधारला आहे.. 24 कॅरेट सोने 1,09,640 रुपये, 23 कॅरेट 1,09,200, 22 कॅरेट सोने 1,00,430 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 82,230 रुपये, 14 कॅरेट सोने 64,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,24,594 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
शुद्ध सोन्याची ओळख अशी करा
सोन्याच्या दागिन्याची शुद्धता ओळखण्याची एक पद्धत आहे. यामध्ये हॉलमार्कशी संबंधित अनेक चिन्हे दिसून येतात. या चिन्हांमुळे सोन्याची गुणवत्ता सिद्ध होते. सोने कोणत्या कॅरेटचे आहे ते दिसून येते. सोन्यामध्ये एक कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंतची तफावत असते. सोन्याचे दागिने तयार करण्यसाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर होतो. ज्वेलरी वर हॉलमार्क लावणे, चिन्हांकित करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.