
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये (Gold And Silver Rate Today) सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये तब्बल पंधराशे रुपयांची..तर चांदीच्या दरात सुद्धा पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 20 हजार 500 रुपयांवर पोहचले आहेत तर चांदीच्या दराने 1 लाख 51 हजाराचा टप्पा गाठला आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याने चांदीच्या दराने पुन्हा नवा उच्चांक केला आहे. दोन दिवसात सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये प्रत्येकी अडीच हजार रुपयांची वाढ झाली आहे. एकाच महिन्यात सोन्याच्या दराने तब्बल एक लाख वीस हजारांचा तर चांदीच्या दराने दीड लाखांचा आकडा पार केला आहे. वाढलेल्या दरामुळे दसरा मुहूर्तावर सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
कालचा भाव काय?
काल जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली होती. काल सोने आणि चांदीत प्रत्येकी 1 हजार रुपयांची वाढ झाली असून दराने नवा इतिहास रचला होता. सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 19 हजार 300 रुपयांवर पोहोचले होते. तर चांदी जीएसटीसह 1 लाख 50 हजार रुपयांवर पोहचली होती. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याच्या दराने काल 1 लाख 19 हजार तर चांदीच्या दराने दीड लाखांचा आकडा पार केला.
सोन्याची किंमत काय?
goodreturns.in नुसार, 29 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 141 रुपयांनी वाढले. तर आज सकाळच्या सत्रात 30 सप्टेंबर रोजी 1 ग्रॅम 24 कॅरेट सोने 142 रुपयांनी वाधरले. म्हणजे दोन दिवसात 10 ग्रॅम सोने जवळपास 3000 रुपयांनी महागले. आज सकाळच्या सत्रात 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा भाव 11,846 रुपये तर 22 कॅरेट सोने 10,860 रुपये इतका आहे.
चांदीची 11 हजारांची महागाई
गेल्या आठवड्याच्या अखेरीस चांदी 9000 रुपयांनी वधारली होती. तर 29 सप्टेंबर आणि आज 30 सप्टेंबर रोजी चांदी प्रत्येकी हजार रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,51,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने आणि चांदी घसरले. 24 कॅरेट सोने 1,16,900 रुपये, 23 कॅरेट 1,16,440, 22 कॅरेट सोने 1,07,008 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 87,680 रुपये, 14 कॅरेट सोने 68,390 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,44,387 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.