
Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव सातत्याने वाढत आहे. आज तर सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला. दोन दिवसात चांदीच्या दरामध्ये तब्बल 15000 रुपयांनी तर सोन्याचे दरात पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या काळात लोक मोठ्या प्रमाणात सोने, चांदीची खरेदी करतात. मात्र सततच्या भाववाढीमुळे आता सोने खरेदी करणाऱ्यांपुढे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.
जळगावातील सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात गेल्या दहा दिवसांकडून दररोज वाढ होत आहे. आज केवळ चांदीच्या दरात एक तासात तब्बल सात हजार रुपयांची विक्रमी वाढ झाली. दोन दिवसात चांदीच्या दरामध्ये तब्बल 15000 रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली. चांदीसोबतच सोनेदेखील तेवढेच चकाकत आहे. दोन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल पाच हजार रुपयांची वाढ झाली आहे. सोन्या आणि चांदीचे दर वाढण्यामागची वेगवेगळी कारणं असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दिवाळीत आणखी भाव वाढतील अशी शंका व्यक्त केली जात आहे. म्हणूनच ग्राहक आजपासूनच सोने, चांदी खरेदी करण्यासाठी गर्दी करत असल्याचे देखील सराफ व्यावसायिक म्हणाले आहेत. सतत चार दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात होत असलेल्या विक्रमी वाढीमुळे जळगावचे ग्राहक तसेच सराफ व्यवसायिकदेखील चक्रावले आहेत.
जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात विक्रमी वाढ पाहायला मिळाली. येथे एका तासात चांदीच्या दरात तब्बल 7 हजारांची वाढ झाली. चांदीचा दर जीएसटीस 1 लाख 67 हजार रुपयांवर पोहोचला आहे. सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर चांदीचा दर विना GST 1 लाख 55 हजार रुपयांवर होता. दुपारी 2 वाजेपर्यंत हाच दर कायम होता. नंतर मात्र दुपारी 3 वाजता चांदीच्या दरात तब्बल 7 हजारांनी वाढ झाली. सोन्याच्या दरातदेखील 500 रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचा दर विना जीएसटी 1 लाख 23 हजार रुपयांवर पोहोचला आहे. सोन्या चांदीच्या दरात सलग चार दिवसांपासून मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, सोने-चांदीचा भाव वाढत असल्याने दागिने खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलावर्गामध्ये नाराजी दिसून आली. सोने, चांदीचे भाव एवढे वाढत असतील तर आम्ही खरेदी कशी करावी, असा प्रश्न या महिलांपुढे उभा राहिला आहे. स्वप्नातही विचार केला नव्हता की भाव सोन्याचे आणि चांदीचे भाव एवढे वाढतील, असे मत जळगावच्या सराफा बाजारातील एका महिला ग्राहकाने व्यक्त केले. सोन्याचा भाव प्रचंड भाव वाढल्यामुळे आता 24 कॅरेट सोन घेणं शक्य नसल्याने 22 कॅरेट तसेच 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांमध्ये हौस भागविण्याची वेळ आल्याच महिलांचं म्हणणं आहे. अनेक जण दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करत असतात. मात्र दिवाळीत पुन्हा भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता ग्राहक आहे त्या भावात आजच सोने खरेदी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दागिन्यांचे भाव वाढल्यामुळे हौस पूर्ण करण्यासाठी आता बेन्टेक्सचे दागिने वापरण्याची वेळ आली असल्याचेदेखील महिलांचे म्हणणे आहे.