
आज देशभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीने मोठी उसळी घेतली. दिल्ली, मुंबई, चेन्नईसह इतर मोठ्या शहरात आज सोने 1040 रुपयांनी महागले. तर चांदीने किलोमागे एक हजारांची भरारी घेतली. किंमतींची अपडेट कळताच सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजारातून काढता पाय घेतला. तर ज्यांना सोने मोडायचे आहे, त्यांनी बाजारात गर्दी केली. यापूर्वी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे.
आज इतके महागले सोने
भारतीय बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,02,340 प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचला. काल 23 जुलै रोजी हा भाव 1,01,300 रुपये होता. एका दिवसात सोन्यात 1040 रुपयांची वाढ झाली. तर 22 कॅरेट सोने आता 93,810 प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याची किंमत 76,760 इतकी झाली आहे. दिल्लीत 24 कॅरेट सोने 1,02,490 प्रति 10 ग्रॅम तर मुंबई आणि कोलकत्तामध्ये ही किंमत 1,02,340 रुपये इतकी आहे. चेन्नईत सोन्याचा भाव 1,02,340 रुपये इतका आहे.
चांदीची एक हजारांची उसळी
सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीत मोठी उसळी आली. 23 जुलै रोजी चांदी 1,18,100 प्रति किलो इतकी होती. तर आज हा भाव 1,19,100 पर्यंत पोहचला आहे. दिल्ली, मुंबई, बेंगळुरु, आग्रा आणि गाझियाबाद सारख्या शहरात चांदी 1,19,100 प्रति किलोवर पोहचली तर चेन्नई आणि हैदराबाद शहरात हा भाव 1,29,100 वर पोहचला आहे.
किंमतीत वाढ कशामुळे?
जागतिक बाजारात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत आहे. आर्थिक अनिश्चिततेमुळे, गुंतवणूकदार आता सोने आणि चांदीकडे वळाले आहेत. यामुळेच किमती सतत वाढत आहेत, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सर्व देशांवर अमेरिकेचे नव्याने टेरीफ रेट कार्ड लागू झाले आहेत. त्यामुळे जगातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेचा देखील सोन्या- चांदीच्या दरावर परिणाम झाल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे. सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे अनेक ग्राहक मोड करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी करत आहेत. येत्या काही दिवसात सोने आणि चांदी अजून किती उसळी घेईल ही चिंता ग्राहकांना लागली आहे.