
Gold And Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ चढऊतार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचा तसेच चांदीचा भाव चांगलाच वाढला होता. ऐन सणासुदीच्या काळात हे मौल्यवान धातू महागल्यामुळे अनेक महिलांचे दागिने खरेदीचे स्वप्न अधुरेच राहिले होते. आता मात्र सोने आणि चांदीचा भाव चांगलाच गडगडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोन्याच्या भावात आपल्या सर्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत 6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आता सोने खरेदीकडे लोकांचा कल वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी (22 ऑक्टोबर) जागतिक बाजारात सोन्याचा भाव घसरला. मंगळवारीही सोन्याच्या किमतीत पाच टक्क्यांनी घसरण झाली होती. ही घसरण ऑगस्ट 2020 नंतरची एका दिवसातील सर्वाधिक घसरण होती. सोमवारी सोन्याचा भाव 4,381.21 डॉलर प्रतिऔंस होता. आता हाच भाव बुधवारी 4,109.19 डॉलर प्रतिऔंसपर्यंत खाली आहे. देशांतर्गत बाजारातही सोन्याचा भाव कमी झालेला आहे.
देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव 132,294 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावरून 128,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. म्हणजेच सोन्याच्या भावात एकूण 3 टक्क्यांनी 4294 रुपयांची घसरण झालेली आहे. या वर्षी सोन्याने साधारण 60 टक्क्यांनी रिटर्न्स दिलेले आहेत. काही दिवसांपूर्वी भाव वाढलेले असताना लोकांनी सोने विक्री करून नफा नोंदवला. त्यामुळे आता सोन्याचा भाव घसरल्याचे, तज्ज्ञांचे मत आहे. दुसरीकडे अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारविषयक संबंधांत सुधारणा होत आहे. यासह भारत आणि अमेरिका यांच्यातही व्यापारासाठी चर्चा होत आहे. त्यामुळेही सध्या व्यापारविषयक अस्थिरता कमी होताना दिसत असल्याने सोन्याचा भाव घसरत असल्याचे बोलले जात आहे.
सराफा बाजारात चांदीच्या किमतीतही घसरण होताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याचा भाव 8100 रुपयांनी घसरला आहे. सध्या चांदीचा भाव 1,63,900 रुपये प्रति किलोपर्यंत कमी झालेला आहे. अमेरिकेत 21 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव 8 टक्क्यांनी घसरून 48.11 डॉलर्स प्रतिऔंसवर पोहोचला होता. 17 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव 54.47 डॉलर प्रति औंसवर होता. म्हणजेच चांदीचा भाव आपल्या सार्वकालिक उच्चांकावरून 12 टक्क्यांनी कमी झाला आहे.