
सध्या सोन्याची चमक वाढली आहे. सोने माघार घेण्याच्या तयारीत नाही. सोन्याने आताच सव्वालाखांचा टप्पा गाठला आहे. तर सोने अजून भरारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोने महागले असले तरी अनेकांना सोन्यातच गुंतवणूक करायची आहे. सोन्यावणी परतावा मिळावा अशी त्यामागे अपेक्षा आहे. मग Gold ETF, सोने की म्युच्युअल फंड, कशामुळे नशीबाला चमक येईल? तुमचा पोर्टफोलिओ कोणत्या गुंतवणुकीमुळे सोनेरी होईल?
सोन्याचा भाव काय?
10 ऑक्टोबर 2025 रोजी गुडरिटर्ननुसार 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,22,440 रुपये इतका होता. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा किंमत 1 लाख 12 हजार 220 रुपये इतका होता. ibjarates इंडियन बुलियन्स मार्केटनुसार 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 20 हजार 850 रुपये तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 1 लाख 10 हजार 690 रुपयांवर होते. स्थानिक बाजारात विविध कर, जीएसटी यांच्या प्रभावामुळे किंमतींवर परिणाम होतो. जळगावच्या सराफा बाजारातही सोने कमाल दाखवत आहे.
गुंतवणुकीची घाई नको
गेल्या 12 महिन्यात सोन्याने 51.33 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तुमची वैयक्तिक जोखीम घेण्याची क्षमता आणि सोन्याचे गणित याची सांगड घालत तुम्हाला गुंतवणूक करता येईल. सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी एकदमच कमी नाही. अनेक जण ठोक सोने खरेदी करत आहे. तर काही महिला ग्राहक दाग-दागिने खरेदी करत आहेत. तर तज्ज्ञांना गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड आणि म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीसाठी सर्वात चांगले पर्याय वाटतात. या तीनही प्रकारात मोठा धोका नाही. सोने बाळगण्याची चिंता नाही. हा व्यवहार पारदर्शक आहे. गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम नसली तरी चालते. तुम्ही SIP च्या माध्यमातून छोटी छोटी रक्कम गुंतवून या तीनही प्रकारात मोठी गुंतवणूक करू शकता. भविष्यात सोन्याची चांगली वाटचाल राहिल्यास तुम्हाला सोन्यावाणी परतावा मिळतो.
पण काही तज्ज्ञांच्या मते सोन्यात हा सध्या चढाईचा काळ आहे. सोने कधी झर्रकन खाली येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सोने खरेदीचा सपाटा न लावण्याचा सल्लाही काही तज्ज्ञ देतात. गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड, गोल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना जोखीम घेण्याची तयारी, परताव्यासाठी प्रतिक्षा आणि भविष्यातील तुमचे आर्थिक उद्दिष्ट याचा सारासार विचार करुन गुंतवणूक करणे फायदेशीर असेल, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे.
डिस्क्लेमर : हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचा अभ्यास महत्त्वाचा आहे. वित्त सल्लागाराचा सल्लाही महत्त्वाचा आहे.