
Gold and Silver Rate Today : पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे मौल्यवान धातूंची मागणी वाढली. मात्र जागतिक अनिश्चितता आणि डॉलर मजबूत झाल्याने सोने आणि चांदीच्या किमती कोसळल्या आहेत. पण असं असलं तरी काल, 25 मार्च रोजी, युद्ध संपण्याच्या आशेच्या वातावरणात, एमसीएक्सवर सोने आणि चांदी या दोन्हींच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली होती. सोन्याच्या दरात 5,500 रुपयांनी तर चांदीच्या दरात 12 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली. दिवसअखेर बाजारात वाढ झाली, पण चांदीवर दबाव कायम राहिला, त्यामुळेच हा धातू विक्रमी उच्चांकावरून जवळपास 1.85 लाखांनी घसरला आहे.
जानेवारीत बनवला रेकॉर्ड
जानेवारी 2026 मध्ये भारतात चांदीच्या किमतींनी 4 लाख 20 हजार 048 रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. मात्र, हा उच्चांक गाठल्यापासून, या किमती आता सुमारे 2,34,700 पर्यंत घसरल्या आहेत. चांदीच्या किमतीत अंदाजे 1.85 लाख रुपयांची घसरण झाली आहे, ही सुमारे 44 टक्के घट आहे. यामुळे ही खरेदीची संधी आहे की अजून घसरण होणार आहे असा विचार करणं गुंतवणूकदारांना भाग आहे.
का घसरली चांदी ?
चांदीच्या किमतीतील या घसरणीमागे अनेक जागतिक घटक कारणीभूत आहेत.
– मजबूत होत असलेला अमेरिकन डॉलर
– वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती
– सततची महागाई
– अमेरिकेतील व्याजदर दीर्घकाळासाठी उच्च राहण्याची शक्यता आहे.
– तज्ञांच्या मते, वाढती महागाई आणि जागतिक तणाव, विशेषतः अमेरिका-इराण संघर्षामुळे, बाजारपेठ अस्थिर आहे. त्यामुळे, फेडरल रिझर्व्हकडून नजीकच्या काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता नाही, ज्यामुळे मौल्यवान धातूंवर दबाव कायम राहू शकतो.
सोन्याचे दर
25 मार्च रोजी MCXवर सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. सोनं 4 टक्के किंवा 5500 रुपयांनी वाढून 10 ग्रॅमसाठी दर 1 लाख 44 हजार 400 वर पोहोचला. सराफा वेबसाइट्सनुसार, काल सकाळच्या सत्रात किरकोळ दरात 5510 ची वाढ होऊन ते प्रति 10 ग्रॅम 144,950 रुपयांवर पोहोचलं होतं.