
IPL चे तिकीट महागणार आहे. हा GST बदलाचा फटका आहे. कर 40 टक्क्यांपर्यंत गेला आहे. म्हणजेच हेच IPL चे तिकीट आता 1400 रुपयांना मिळणार आहे, म्हणजेच प्रत्येक 1000 रुपयांवर 120 रुपये अतिरिक्त कर लागणार आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया. IPL चं नाव ऐकताच चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वेगवान होतात. पण आता स्टेडियममध्ये बसून सामन्याचा आनंद घ्यायचा असेल तर खिसा हलका करावा लागेल. सरकारच्या नव्या GST रचनेत आयपीएलच्या तिकिटांना सर्वोच्च कराच्या स्लॅबमध्ये टाकण्यात आले आहे.
थेट 28 टक्क्यांवरून 40 टक्के GST
यापूर्वी IPL च्या तिकिटांवर 28 टक्के GST आकारला जात होता. म्हणजेच 1000 रुपयांचे तिकीट 1280 रुपयांना मिळत होते. आता हा कर 40 टक्क्यांपर्यंत गेला आहे. म्हणजेच हेच तिकीट आता 1400 रुपयांना मिळणार आहे, म्हणजेच प्रत्येक 1000 रुपयांवर 120 रुपये अतिरिक्त कर लागणार आहे.
वेगवेगळ्या तिकिटांवर परिणाम
छोट्या बजेटची तिकिटे घेतली तरी अडचण काही कमी नाही. पूर्वी 500 रुपयांच्या तिकिटाची किंमत 640 रुपये होती, ती आता 700 रुपये होणार आहे. 1000 रुपयांच्या तिकिटाची किंमत आता 1400 रुपये झाली आहे. 2000 रुपयांच्या तिकिटाची किंमत आधी 2,560 रुपये होती, ती आता 2,800 रुपये होणार आहे. प्रत्येक श्रेणीच्या तिकिटांवर परिणाम होणार असून आयपीएल पाहणे हा आता लक्झरी अनुभवासारखा झाला आहे.
सरकारच्या GST सुधारणेचा थेट फायदा आता खेळाडूंना होणार असून आता बॅडमिंटन रॅकेट, क्रिकेट ग्लोव्हज, फुटबॉल सारख्या गोष्टी पूर्वीपेक्षा स्वस्त होणार आहेत. आयपीएल पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता अधिक खिसे मोकळे करावे लागतील, तर क्रीडा साहित्य आणि अॅक्सेसरीज खरेदी करणे सोपे आणि परवडणारे असेल.
फक्त IPL आणि मोठमोठ्या क्रीडा स्पर्धाच कशासाठी?
सरकारने IPL आणि तत्सम महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांना ‘अनावश्यक आणि लक्झरी श्रेणी’मध्ये टाकले आहे. त्यामुळे कॅसिनो, रेस क्लब आणि लक्झरी वस्तूंचा समावेश असलेल्या टॅक्स स्लॅबमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे. तर सामान्य क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांवर अजूनही 18 टक्के GST आहे.
चित्रपटांमध्ये दिलासा
IPL ची तिकिटे महाग झाली असतानाच चित्रपट रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. 100 रुपयांपर्यंतच्या चित्रपट तिकिटांवर आता फक्त 5 टक्के GST आकारला जाईल, जो पूर्वी 12 टक्के होता. म्हणजेच छोट्या शहरांमध्ये आणि सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये सिनेमा पाहणं स्वस्त होणार आहे. 100 रुपयांपेक्षा जास्त तिकिटांवर 18 टक्के कर कायम राहणार आहे. यामुळे प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहात परतयेऊ शकतील आणि इंडस्ट्रीची कमाई वाढू शकेल, असा विश्वास चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना वाटतो.
IPL ही जगातील सर्वात महागडी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. आता 40 टक्के GST नंतर सर्वसामान्य प्रेक्षकांना तिकीट मिळणे अधिक अवघड होणार आहे. त्याशिवाय स्टेडियम शुल्क आणि ऑनलाइन बुकिंग फी जोडली तर क्रिकेट हा आता केवळ पॅशन च नव्हे तर खिशावर भरमसाठ खर्चाचा खेळ बनला आहे.
नवे दर सप्टेंबरपासून लागू होतील
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी वस्तू आणि सेवा कराच्या (GST) दरात बदल करण्याची घोषणा केली. GST कौन्सिलच्या 56 व्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या नव्या दरांनुसार 12 टक्के आणि 28 टक्क्यांचे स्लॅब आता रद्द करून केवळ 5 टक्के आणि 18 टक्के करण्यात आले आहेत. हे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.